तिरुवनंतपुरम : भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने शनिवारी तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमध्ये इतिहास रचला, जिथे त्यांनी एलडीएफच्या ४० वर्षांच्या राजवटीचा अंत करून महापालिकेवर नियंत्रण मिळवले.
तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील १०१ वॉर्डापैकी एनडीएने ५०, एलडीएफने २९, यूडीएफने १९ आणि दोन अपक्ष उमेदवारांनी जिंकले. भाजपने केरळमध्ये २६ ग्रामपंचायती तसेच दोन महापालिकांव विजय मिळवला. पण चर्चा आहे ती तिरुवनंतपुरम महानगरपालिकेत भाजपने मिळवलेल्या विजयाची. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत भाजपच्या केरळमधील कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे जाहीर अभिनंदन केले. मागील अेक पिढ्यांपासून केरळमध्ये बलिदान देणाऱ्या शेकडो भाजप कार्यकर्त्यांना हा विजय म्हणजे आदरांजली आहे, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. पक्षासाठी कार्यकर्ते ही खरी ताकद असल्याचे पंतप्रधान मोदींनी आवर्जून नमूद केले.
केरळमधील तिरुवनंतपुरम महानगरपालिकेतील विजय हा भाजपच्या सातत्याने केलेल्या प्रयत्नांचे फळ आहे, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. केरळमधील राजकीय वातावरण बदलत असल्याचे हे ताजे उदाहरण आहे, असेही ते म्हणाले. तो काळ दूर नाही जेव्हा मतदार काँग्रेस, त्यांचे समर्थक, डावे यांना सोडून भाजपला भरघोस मतदान करू लागतील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.