कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ


आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला ट्रेनने गेलो. पश्चिमेकडून मुलुंडच्या रेल्वेस्टेशन बाहेर पडत होतो. अचानक रजनीला आपल्या अमेरिकेच्या भाचीचा फोन आला आणि तिच्याकडे साधारण रात्रीचा दीड वाजलेला असताना तिने का फोन केला असेल, या विचाराने तिथेच एका रिकाम्या बाकावरती बसली आणि स्वाभाविकपणे मीही तिच्या बाजूला बसलो. ती बोलण्यात मग्न होती आणि मी आसपास पाहत होतो. समोर आपल्या जुन्या वस्तू, कपडे इत्यादी ठेवण्यासाठी तिथे काही लाकडी चौकटी तयार केलेल्या होत्या. कोणी ते ठेवले आहे, कशासाठी ठेवले आहे वगैरे सगळी माहिती त्यावर व्यवस्थित लिहिली होती. इतक्यात एक बाई तिथे आली आणि तिने दोन ते तीन कप्प्यात मावेल इतके कपडे ठेवले आणि ती निघून गेली.


अमेरिकेत राहणारी माणसे घराबाहेर किंवा आपल्या अंगणात आपल्याला नको असलेले फर्निचर वा वस्तू अशा रीतीने बाहेर ठेवतात आणि त्याखाली लिहितात की, कोणीही हे उचलून घेऊन जाऊ शकतो म्हणून! त्याचा उपयोग बऱ्याच जणांना होतो. आपल्याला नको असलेले सामान अशा रीतीने ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत सहज पोहोचते आणि त्याची गरज भागवली जाते ही किती छान गोष्ट आहे, असे मला नेहमी वाटायचे. मला इतका आनंद झाला की, आपल्याकडे पण त्यांच्याकडचा असा चांगला आणि समाजोपयोगी विचार इथे राबवला जातोय! माझा हा आनंद काही क्षणांसाठीच टिकला कारण त्या बाईने कपडे आणून ठेवल्यावर दीड मिनिटांच्या आत एक रेल्वे कर्मचारी तिथे आला आणि त्याने तिथले एकूण एक कपडे उचलले आणि तो तिथून रेल्वे स्टेशनवर असलेल्या कोणत्या तरी खोलीत शिरला.


या प्रसंगाने मी खूप अस्वस्थ झाले. त्याच्या एकंदरीत हालचालींवरून असे लक्षात येत होते की, तो स्वतःच्या फायद्यासाठी ते उचलत असावा!
मुंबईच्या कोणत्याही भागात साधारण रेल्वेस्टेशन जवळच्या रस्त्यावर जुने कपडे विकण्यासाठी उपलब्ध असतात. हा बाजार फार मोठा आहे. कुठेतरी वाचल्याचे आठवते की नव्या कपड्याच्या बरोबरीने हेही कपडे विकले जातात. त्याचे प्रमाण नवीन कपड्यांच्या पंचवीस ते तीस टक्के इतके आहे. जर हा बाजार इतका मोठा आहे, तर गरजवंतही तितक्याच मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे; परंतु काही माणसांना हे कपडे वा वस्तू या गरजवंतांना मोफत द्याव्याशा वाटत असतील, तर कोण्या तरी मध्यस्थाने त्या असे तऱ्हेने हडप करणे बरोबर नाही. हे दृश्य माझ्या दृष्टीस पडले तसे ते आणखीही काही लोकांच्या दृष्टीस नक्कीच पडत असेल, असा विचार मनात आला. या गोष्टीमुळे दाता कदाचित पुढच्या वेळेस इथे कपडे आणून टाकणे बंद होऊ शकते. आपल्याला एखादी गोष्ट चुकीची वाटते तेव्हा नेमकेपणाने काय करायचे, हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाला. मला लहानपणीची एक गोष्ट अजूनही आठवतेय की जेव्हा कुठे ओला किंवा सुका दुष्काळ पडायचा तर त्यानंतर दोन-चार दिवसांत प्रत्येक सोसायटीच्या नोटीस बोर्डवर एक निवेदन लावलेले दिसायचे की पूरग्रस्तांसाठी, दुष्काळग्रस्तांसाठी आपल्या सोसायटीच्या दाराशी ठेवलेल्या कार्डबोर्डच्या खोक्यामध्ये आपल्या जुन्या वस्तू, कपडे इ. आणून टाकाव्यात. हे निवेदन वाचून सोसायटीतील कमीत कमी पंचवीस ते तीस टक्के रहिवासी आपले जुने कपडे आणून त्या बॉक्समध्ये टाकायचे. एक मोठा ट्रक यायचा आणि त्या बॉक्समधील वस्तू आणि सामान घेऊन जायचा. हे सामान खरंच गरजवंतांपर्यंत पोहोचते का, असा संशय काही माणसांना पडला कारण त्यांनी त्याबाबतीत काहीतरी वेगळे घडल्याचे पाहिले. ते कपडे त्याच भागात जुने कपडे विकणाऱ्या माणसांकडे सापडल्याच्या तक्रारी अनेकांनी केल्याचे आठवतेय. हे तर वापरलेल्या जुन्या वस्तूंबद्दल आणि कपड्यांबद्दल! मग मनात विचार येतो की, जेव्हा दानशूर व्यक्ती मोठ्या रकमेच्या देणग्या देतात किंवा काहीजण आपल्याकडे असलेल्या तुटपुंजा मिळकतीतूनसुद्धा एखाद्या संस्थेला मनापासून छोट्या रकमेची का होईना देणगी देण्याचा प्रयत्न करतात अशांचे पैसे गरजवंतांसाठी वापरले जातात का किंवा अशी काही यंत्रणा आहे का, जेणेकरून आपल्याला याची माहिती मिळू शकेल? देणगी या शब्दाची व्याख्या शोधण्याचा प्रयत्न केला तेव्हा जी व्याख्या मिळाली ती मी इथे देत आहे. धर्मादाय, मानवतावादी मदत किंवा एखाद्या चांगल्या कामासाठी दिलेली भेट, जी पैसे, वस्तू (अन्न, कपडे), सेवा किंवा वेळेच्या स्वरूपात असू शकते. देणगी गुप्तपणे द्यावी असे म्हटले जाते, पण अलीकडे देणगीच्या रकमेनुसार करामध्ये काही सवलतीही मिळतात. त्यामुळे देणगीदार पावती घेऊन देणग्या देतात आणि देणगीतून कोणत्याही फळाची अपेक्षा ठेवू नये, असे म्हटले जाते. अन्नदान, धनदान, श्रमदान किंवा ज्ञानदान अशा देणग्यांमुळे समाजाच्या कल्याणासाठी हातभार लागतो आणि धार्मिक, शैक्षणिक तसेच सामाजिक कार्यांना बळ मिळते!


तर शेवटी काय? जेव्हा शक्य असेल तर जरूर देणगी द्यावी. अशा जगामध्ये कितीतरी संस्था आहेत ज्या केवळ देणग्यांवर चालतात. जगात चांगले-वाईट लोक असतात, चांगल्या-वाईट घटना घडत असतात त्याप्रमाणे आपण नेहमीच चांगला विचार करून, ज्या संस्थेविषयी आपल्याला खात्री आहे अशा संस्थांना तरी देणगी द्यायलाच हवी. कदाचित देणगी दिल्यामुळे आपल्या मिळकतीतला एक छोटासा हिस्सा कमी होईल, कदाचित आपला थोडासा वेळ खर्च होऊ शकेल; परंतु त्यामुळे कदाचित एखाद्या गरजवंताचे आयुष्य उभे राहील!


pratibha.saraph@ gmail.com

Comments
Add Comment

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,

स्ट्रॉ ने पेय कशी पितात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं,

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर केल्याने होत आहे रे।  आधी केलेची पाहिजे।

विष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते

ध्यास उत्कृष्टतेचा !

कथा : रमेश तांबे नमस्कार बाल मित्रांनो. आज मी तुम्हाला इटलीतील एका प्रसिद्ध शिल्पकाराची गोष्ट सांगणार आहे.