काँग्रेसच्या महत्वपूर्ण बैठकांना वारंवार गैरहजर
नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तिरुवनंतपुरम येथील खासदार शशी थरूर यांच्या राजकीय भूमिकेबाबत गेल्या काही काळापासून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. थरूर हे गुरुवारी राहुल गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काँग्रेसच्या लोकसभा खासदारांच्या बैठकीला अनुपस्थित राहिले. थरूर यांच्या अनुपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. मात्र या बैठकीला अनुपस्थित राहण्याबाबत थरूर यांनी पूर्वकल्पना दिली होती, असे पक्षाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या बैठकीला काँग्रेसचे आणखी एक ज्येष्ठ नेते आणि चंडिगडचे खासदार मनीष तिवारी हेसुद्धा अनुपस्थित होते.
थरूर हे काल रात्री कोलकाता येथे प्रभात खेतान फाऊंडेशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित होते, असे त्यांच्या एक्सवरील टाईमलाईनमधून दिसत आहे. थरूर हे गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकांना वारंवार अनुपस्थित राहत असल्याचे दिसून येत आहे. याआधी काही दिवसांपूर्वी शशी थरूर काँग्रेसच्या एका धोरणात्मक बैठकीला दांडी मारली होती. मात्र मी या बैठकीला जाणीवपूर्वक अनुपस्थित राहिलो नव्हतो, तर त्यावेळी मी केरळमधून येणाऱ्या विमानात होतो, असे शशी थरूर यांनी स्पष्ट केले होते.
सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या त्या बैठकीला थरूर हे अनुपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले गेले होते. त्याआधी एसआयआरच्या मुद्द्यावर झालेल्या काँग्रेसच्या बैठकीलाही थरूर यांनी प्रकृती अस्वस्थ्याचा हवाला देत दांडी मारली होती.






