मोहित सोमण
आपण वास्तविक जगात राहतो वास्तविक जीवनात खातो जगतो पण कधीकधी भीषण वास्तविकता आपल्या नजरेसमोर येत नाही आली तरी आपण स्विकारत नाही याच दृष्टीने काहीतरी महत्वाचे प्रकाशास आणणे काळाच्या ओघात गरजेचे आहे. जगभरात असामाजिक तत्वापेक्षाही असमानता हा मूलभूत मुद्दा वणवा बनू पाहतो आहे. जगभरात मोठ्या प्रमाणात संपत्तीतील विषमता वाढत आहे. धनाढ्य आणखी धनाढ्य होत आहे गरीब आणखी गरीब आहे ही वास्तविकता आहे हे पहिले आपण स्विकारले पाहिजे अनेकदा याला राजकीय चष्म्यातून पाहिले जाते. अनेकदा यावर खिल्ली उडविली जाते. अनेकदा यावर टिंगलटवाळी करत 'डावे' विचार म्हणत दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे हा वणवा मशालीसारखा तेवत आहे आणि भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. वेळेतेच यावर उपाययोजना करणे हे समाजासाठी हितकारक ठरेल. अनेक अहवालानुसार सातत्याने गरीब श्रीमंतातील दरी वाढत आहे.
असं म्हणतात पैसा पैशाला खेचतो. तर गरिबी गरिबीला आणखी वाढवते. सरकार कोणाचेही असो सरकारी दरबारी योजना आणल्या तरी त्या प्रत्येक योजना प्रत्येक गरजू व्यक्तीकडे पोहोचते का? पोहोचल्यास किती पोहोचतात आणि पोहोचल्याच तरी त्या तुटपुंज्या पैशात आणखी काय करता करता येईल. अनेकदा निवडणूक जिंकायच्या नादात पैशाची खिरापत योजनेतून वाटली जाते. व्यक्तीला स्वावलंबी बनवण्याऐवजी अनेकदा परावलंबी बनवत आहे. स्वतः पायावर उभे राहून आपण दुसऱ्याला नोकरी देऊ हे विचार तरूणांच्या मनात बिंबवण्यासाठी कधीही इच्छाशक्ती दिसली नाही. निश्चितच एकांगी नजरेतून त्यात पाहता येणार नाही. इच्छाशक्ती व पाठबळ या दोन स्वतंत्र गोष्टी समजल्या जात असल्या तरी दोन्ही गोष्टींचा मेळ आपण घालू शकलो नाही ही वस्तुस्थिती आहे. आजही अनेकदा शिक्षणाचा प्रसार झालेला नाही. आदिवासी क्षेत्रात एक गाव असे नुकतेच सापडले ज्या गावाचा १९४७ सालापासून भारताच्या नकाशावर उल्लेखच नाही. अशा वेळी मागासलेल्या वर्गातील मुलांना शिकायची इच्छा असेल तर पाठबळ द्यायला यंत्रणा राबली पाहिजे दुसरीकडे सरकारी योजनांचा गैरफायदा घेऊन 'आईतखाऊ' बनवण्याचे कामही पद्धतशीरपणे समाजात सुरु असते ज्यांना पाठबळाची आवश्यकता नाही शिकण्याची उमेद नाही त्यांना लाभाचा पाऊस पडतो.
शेतीची मशागत केल्यानेच शेत समृद्ध होत असते. गरीब व श्रीमंत यांच्यातील मुद्देसूद विश्लेषण करण्यापूर्वी प्रथम या मुद्यावर प्रकाश टाकणे महत्वाचे आहे. म्हणूनच हा प्रपंच. जीवनात अशा विविध कारणांमुळे समाज घडत असतो. बिघडत असतो. या मानसिकतेतून समाज आर्थिक विषमता वाढत असतो कारण जो लाभार्थी असतो त्याची सामाजिक पोहोच चांगली असते. कुठल्या ठिकाणी कुठले कार्ड वापरता येईल कुठे कुणाशी जवळीक केल्याने लाभ पदरात पडेल कुठे सलगी केल्याने साम्राज्य उभे करता येईल या सगळ्याची समज असल्याने त्याला आपल्या ज्ञानाने 'हाताळणी' करता येते. दुसरीकडे अडाणी समाजाला चाकोरीबाहेर काय चाललंय याच भानही नसल्याने ते प्रवाहाच्या बाहेर येऊच शकत नाही. उदाहरणार्थ आजही अनेक खेडीपाडी भारतात आहेत की ज्यांनी जीवनात रेल्वेही पाहिली नाही. १४० कोटींच्या भारत देशात अशी किमान १५ कोटी जनसंख्या आजही आहे. जिथे शिक्षण नाही रोजगार नाही वीज नाही समृध्दी करण्यासाठी आवश्यक असलेले साधन नाही, चांगले वेतन नाही अशा पीडीतांना केवळ दीड हजारांची मदत करून भागणार नाही. तर त्यासाठी सगळ्यांचे एकत्रित समानतेचे मनोबल हवे. हे झालं दारिद्र्य रेषेखालील व प्रमाणाबाहेर श्रीमंत व्यक्तींची परिस्थिती.
पण आज एक नवा मध्यमवर्ग निर्माण झाला आहे ज्याच्या गरजा, आकांशा, समज वाढली आहे. पण उच्चपदस्थ अधिकारी बनण्यासाठी अपार कष्ट घेतले असूनही नोकरीसाठी वणवण ते करत असतात. उन्हाळ्यात पावसाळ्यात पर्वा न करता मुलाखती देत फिरत असतात. नाईलाजाने कुठेच नाही तर बीपीओत, कॉल सेंटरमध्ये काम करून आपले पोट भरतात. अनेकदा शिक्षण असूनही योग्य मोबदला दिला जात नाही. पिळवणूक तर सगळ्याच क्षेत्रात आहे. फक्त यावर बोलण्याची कोणी हिंमत करत नाही. दुसरीकडे नवश्रीमंत नियमांची पायमल्ली करून सुद्धा यंत्रणेतील जोरावर कंपन्यावर कंपन्या उघडत आपले नवे साम्राज्य तयार करत आहे. यावर एकच बाजू कायम समाजातून सांगितली जाते ती म्हणजे त्यामागील मेहनत! मेहनत तर गरीब माणूसही करतो म्हणून तो उद्योगपती होऊ शकतो का? तर याचे उत्तर नाही असे आहे. म्हणूनच म्हणतात पैसा पैशाला खेचतो. निश्चितच उद्योगपती बनण्यासाठी अपार मेहनत आहे. राखेतून फिनिक्स उडी घेणारे कृत्य वाईट नाही. परंतु त्यामध्ये नैतिकतेचा भाग किती हा खरा कळीचा मुद्दा आहे. असं म्हणतात पहिले १० कोटी कमवायला मेहनत लागते. त्यानंतर पुढील कमाई आपोआप होत राहते. पण खरच सगळेच करोडपती होतात का?
महिन्याला ५००० देखील कमवू न शकणारे व्यक्ती देशात आजही आहेत. हा देष कृषीप्रधान देश आहे असं म्हणतात पण आकडेवारी पाहिल्यास दिवसेंदिवस अर्थकारणात शेतीचा जीडीपीतील वाटा घसरतच आहे. औद्योगिक व सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या निर्माण जरी झाल्या तरी त्यामागे असणारी भयानक लोकसंख्या गरजूंच्या शोषणासाठी आणखी कारण ठरत आहे. सरकारी आकडेवारी पाहता १ सरकारी नोकरीसाठी किमान ४००० अर्ज सध्या दाखल होत आहेत. ही झाली सरकारी नोकरीची बाब खाजगी क्षेत्रात परिस्थिती तर बिकट आहे. खाजगी क्षेत्रात कर्मचाऱ्यांची उपलब्धता वाढल्याने मालक सांगेल त्या पगारात काम करावे लागते. गरजू ते काम कमी मोबदल्यात करतो देखील पण हे नैतिकतेने योग्य आहे का? प्रत्येक श्रमिकाला ज्याचा योग्य मोबदला मिळणे हा त्यांचा हक्क नाही का?
आपल्या देशात समानतेच्या मोठं मोठ्या गप्पा मारल्या जातात. पण तुम्हाला हे माहित आहे? की देशातील बहुतांश एनजीओ परदेशी पैशावर चालतात? देशातील ७०% एनजीओ सेवाभावी संस्था या परदेशी देणग्यावर चालत असतील तर ते भारतात बसून समानतेची अंमलबजावणी करणार आहेत का? उद्योगपती, राजकारणी, सरकारी अधिकारी, पोलिस यंत्रणा, समाजातील प्रभावी व्यक्ती यांना समाजातील वास्तविकतेची चांगली ज्याण आहे त्याचा फायदा आंतरसंबंधातून होत असतात. वास्तविक पाहता, यांची जाण असूनही नकळतपणे अजाणतेने नवं मध्यम वर्गीय या असमानतेला बळी पडतात त्यावर समाज म्हणून आपण काय करणार आहोत.
ताज्या एका नव्या वर्ल्ड इनइक्विलिटी रिपोर्ट २०२६ मधील माहितीनुसार भारतातच नाही संपूर्ण जगात असमानता वाढत आहे.ती इतकी भीषण परिस्थिती दर्शवते ज्याचा विचार आपण एसीत बसून करु शकत नाही. या अहवालात म्हटलंय की, जगात मोठ्या प्रमाणात सामजिक विषमता, आर्थिक विषमता लैंगिक विषमता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. भारताचाच विचार केल्यास अहवालात म्हटलंय की, देशातील ५८% संपत्ती केवळ १०% व्यक्तीकडे आहे तर उर्वरित ५०% व्यक्तीकडे केवळ १५% संपत्ती आहे. २०२२ सालच्या आधीच्या रिपोर्टमध्ये १०% लोकांकडे ५७% संपत्ती होती. तर उर्वरित ५०% लोकांकडे १३% संपत्ती होती. भारतातील ६५% संपत्ती ही केवळ १०% लोकांकडे आहे तर सर्वात श्रीमंत असलेल्या १% व्यक्तीकडे ४०% संपत्ती देशात आहे. जगभरातही १०% व्यक्तींकडे एकूण जगातील ७५% संपत्ती अस्तिवात आहे. तर उर्वरित २% व्यक्तीकडे केवळ २% संपती अस्तित्वात आहे. हे दिवसेंदिवस वाढतच आहे.
आगीतून फुफाट्यात जाण्यापूर्वी सरकारने यावर ठोस पावले उचलली पाहिजेत तसेच समाजाच्या विचारातही बदल झाला पाहिजे. निश्चितच व्यक्तीचे स्वभाव सारखे नसले तरी समाज म्हणून आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत. व्यापक धोरण आखण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे. समान संधी, समान महत्व, समान स्पर्धा याकडेही व्यापक नजरेतून पाहणे महत्त्वाचे आहे. अखेर ही अंतिम पायरी नाही. आणखी एक मुद्दा म्हणजे वाढलेली भपकेबाजी. संपत्तीचे, श्रीमंती पार्ट्याचे, काढलेल्या लक्झरी सहलीचे इंस्टाग्रामवर ओगंळवाणे प्रदर्शन यामुळे मोठ्या प्रमाणात 'असुया' हे भस्मासूराचे रूप घेत आहे. नवश्रीमंत, गर्भश्रीमंत असणाऱ्या व्यक्तींचा नंगानाच पाहून आपणही आयफोन घेऊन फिरावे, गरज नसतानाही तशी लाईफस्टाईल मिळवावी, मर्सिडीज घेऊन फिरावे यासाठी वाटले ते इथपर्यंत या तरुणांची तयारी पोहोचते तेव्हा हे ओंगळवाणे प्रदर्शन भस्मासूर बनते. व असमानतेचा मुद्दा भलत्याच कारणांसाठी वेगळेच रूप धारण करते. यामुळे या गुंतागुंतीच्या मुद्यात कुणीही हात घालणारा नाही. सायबर गुन्हेगार हे त्यांचे नव स्वरुप आहे, वाढणारी वेश्याव्यवसाय हे या विषमतेतून श्रीमंतीचे व लाईफस्टाईल आकर्षण हे त्याचेच फळ आहे, ओटीटी चित्रपट पाहून ड्रग्स मध्ये पकडले जाणारे तरूणतरुणी त्यांचे स्वरूप आहे. या वास्तविकतेचा सर्वाधिक झटका नव तरुणाईला होत आहे याकडेही कोणी गांभीर्याने बघायला तयार नाही. आज तरीही आपण ठीक स्थितीत आहोत असे म्हणावे लागेल. मध्य व पूर्व आफ्रिकेतील देशाचे उदाहरण हे या विषमतेचे सर्वात मोठे उदाहरण आहे. रस्त्यावर चालणेही मुश्किल झालेल्या बुर्किना फासो, बरूंडी, सुदान,नायजर, मलावी,सोमालिया देशाचे देता येईल. वास्तविक येथे भयाण शांतता निर्माण झालेली आहे. कधीही काहीही होऊ शकते अशी परिस्थिती तिथे विषमतेने निर्माण झाली. केवळ १ ते २ कुटुंबाकडे संपूर्ण देशाची संपत्ती असलेले हेच ते देश आहेत. कृपया या भस्मासूरातून देश वाचला पाहिजे असे देशाच्या प्रत्येक नागरिकाला वाटले पाहिजे हीच ईश्वर चरणी प्रार्थना....
(टीप- वरील विचार लेखकाचे वैयक्तिक विचार आहेत त्याचा प्रकाशकाशी काही संबंध नाही).






