रत्नाकर मतकरींचं ‘स्वर्गात आकाशगंगा’ नव्या अंदाजात
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ चित्रपटातील पहिलं गाणं ‘शाळा मराठी’ला प्रेक्षकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता दुसरं गीत ‘स्वर्गात आकाशगंगा’ हे शाळेतल्या आठवणींना उजाळा देणारं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याचा अनावरण सोहळा अगदी आगळ्या-वेगळ्या पद्धतीने अभिनव ज्ञानमंदिर प्रशालेतील पटांगणात पार पडला. चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्या विद्यार्थीदशेतील अनेक आठवणी या शाळेशी जोडल्या असून याच शाळेच्या मंचावर हेमंत यांनी पहिल्यांदा नाटकात काम केलं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक जिव्हाळ्याचा सोहळा असून शाळेला दिलेली एक मानवंदना आहे. यावेळी क्षिती जोग, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, हरीश दुधाडे, पुष्कराज चिरपुटकर, कादंबरी कदम यांच्यासह गायक रोहित राऊत, जुईली जोगळेकर, संगीतकार हर्ष- विजय उपस्थित होते.
या खास सोहळ्यात चित्रपटातील कलाकार हजारो विद्यार्थ्यांसोबत गाण्यावर थिरकले. विद्यार्थ्यांची ऊर्जा आणि मैदानात दुमदुमलेलं आनंदी वातावरण यामुळे हा गाण्याचा अनावरण सोहळा धमाकेदार ठरला. शिक्षक, विद्यार्थी आणि चित्रपटाची टीम सगळ्यांनी मिळून हा क्षण संस्मरणीय बनवला. सुप्रसिद्ध साहित्यिक स्व. रत्नाकर मतकरी यांनी लिहिलेलं हे कालातीत गीत आजही प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे. संगीतकार हर्ष-विजय यांनी या लोकप्रिय गाण्याला आधुनिक आणि नॉस्टॅल्जिक असा सुंदर स्पर्श देत नव्याने सादर केलं आहे.
गायक रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांच्या आवाजातील मधुर भावस्पर्शी गोडवा या गाण्याला आणखी मोहक करतो. ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ १ जानेवारी २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.