'सागरा प्राण तळमळला' कार्यक्रमाचे आयोजन
नागपूर : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी अंदमान येथे रचलेल्या 'सागरा प्राण तळमळला' या अजरामर गीताला ११५ हून अधिक वर्षे पूर्ण झाली असून या ऐतिहासिक क्षणाचे औचित्य साधून .उद्या १२ डिसेंबर रोजी पोर्ट ब्लेअर येथे 'सागरा प्राण तळमळला' या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
याच कार्यक्रमाच्या निमित्ताने बियोदनाबाद येथे सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री अँड आशिष शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनावरण करण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या प्रक्रियेत थेट सहभाग आणि सहयोगीता नोंदवता आली हे माझे भाग्य आहे, अशा भावना मंत्री आशिष शेलार यांनी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केल्या.
अंदमानमधील श्री विजया पुरम येथे मुंबईतील 'व्हॅल्युएबल ग्रुप'च्या वतीने १२ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता 'सागरा प्राण तळमळला' या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, बियोदनाबाद येथे होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. 'व्हॅल्युएबल ग्रुप'चे संचालक अमेय हेटे यांची संकल्पना असलेला हा पुतळा महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित झालेल्या राम सुतार यांनी साकारला आहे.
पं. हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर, अभिनेता रणदीप हुडा आणि इतिहासकार लेखक डॉ. विक्रम संपत, अभिनेते शरद पोंक्षे हेही या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
यावेळी सावरकरांनी लिहिलेली आणि संगीतकार, गायक पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेली गीते सादर होणार आहेत. या संपूर्ण सोहळ्याचे संयोजन मेराक इव्हेंट्सच्या करीत आहेत.