नागपूर : मनसेतून नुकतेच बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रामगिरी निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर महाजन यांनी भाजप प्रवेशाबाबत सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीबाबत विचारले असता प्रकाश महाजन म्हणाले, “त्यांच्याकडे माझे वैयक्तिक काम होते. मुख्यमंत्र्यांशी पारिवारिक संबंध आहेत.” यावेळी त्यांनी भाजपमध्ये नुकतेच प्रवेश केलेल्या वैभव खेडेकर यांचे कौतुक करताना म्हटले, “वैभव खेडेकर भाजपमध्ये खूप आनंदी आहे. माझ्या पाल्याचा आनंद पाहण्यासाठी आलो आहे. वैभव कमळाकडे गेला, त्यामुळे मी खूश आहे. भाजपचा पराभव झाला की आम्हाला वाईट वाटते. नाते जुने आहे. मी कधीही भाजपविरोधात काम केलेले नाही. आता भाजपने ठरवायचे आहे.” असे सूचक विधान त्यांनी केले.
मी राज ठाकरेंना घाबरत नाही – प्रकाश महाजन
महाजन म्हणाले, “मनसे हिंदुत्वापासून दूर जात आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पक्षाने माघार घेतली. यामुळेच मी बाहेर पडलो. मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा माणूस आहे. हे मी कधी लपवले नाही. मी शाखेतही जातो. मी राज ठाकरेंना घाबरत नाही, संघ विचारांचा माणूस आहे”, असेही त्यांनी सांगितले.