भगवान पतंजली

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी 


योगेन चित्तस्य पदेन वाचां,
मलं शरीरस्य च वैद्यकेन।
योऽपाकरोत् तं प्रवरं मुनीनां,
पतंजलिं प्रांजलिरानतोऽस्मि।।

“चित्तशुद्धीसाठी योगसूत्रे लिहिणाऱ्या, वाणीशुद्धीसाठी पाणिनींच्या व्याकरणशास्त्रावर महाभाष्य लिहिणाऱ्या, शरीरशुद्धीसाठी चरकसंहितेवर संस्करण करणाऱ्या मुनिश्रेष्ठ पतंजलींना प्रणाम” असे भोजराजाने पतंजलींचे वर्णन केले आहे. भोजराजाप्रमाणे चक्रपाणी नावाच्या दुसऱ्या एका विद्वानाने पतंजलीमुनींचे खालीलप्रमाणे वर्णन केले आहे,


पातञ्जलमहाभाष्यचरकप्रतिसंस्कृतैः।
मनोवाक्कायदोषाणां हन्त्रे ऽहिपतये नमः।।


अर्थ : योगसूत्रे, महाभाष्य आणि चरकसंहितेचे प्रतिसंस्करण या तीन कृतींनी अनुक्रमे मन, वाणी आणि देह यांच्या दोषांचा निरास करणाऱ्या पतंजलींना माझा नमस्कार असो. पतंजलींना भगवान शेषाचा अवतार मानतात. गोणिका नावाची एक स्त्री सूर्याला अर्घ्य देत होती. पृथ्वीवर अवतार घेण्यासाठी शेषनाग सूक्ष्म रूपाने तिच्या ओंजळीत पडले. गोणिकेने ओंजळीतले पाणी खाली टाकताच ते बालकरूपाने तिच्यासमोर उभे राहिले. तेव्हा तिने त्यांना आपला पुत्र मानून उचलून घेतले आणि ओंजळीतून पतन पावले म्हणून त्याचे नाव पतंजली ठेवले, अशी त्यांच्या जन्माबद्दल आख्यायिका आहे. पतंजलींनी बाल्यावस्थेतच अध्ययनाला सुरुवात केली. त्यांनी तप करून शिवाला प्रसन्न केले. शिवाने त्यांना पदशास्त्रावर भाष्य लिहिण्यास सांगितले. तेव्हा पतंजलींनी चिदंबरक्षेत्री पाणिनींच्या व्याकरणावरील अष्टाध्यायांवर व कात्यायनाची वार्तिके यांच्यावर विस्तृत भाष्य लिहिले. त्यालाच महाभाष्य म्हणतात. या महाभाष्याची भाषा अतिशय पांडित्यपूर्ण असूनही सहजसुंदर आहे. वाक्शक्ती विश्वव्यवहाराची सर्वप्रमुख आधार आहे. शब्दाच्या स्फोटवाद या सिद्धान्ताचा पाया पतंजलींनी रचला. ज्याच्यापासून अर्थ फुटतो, म्हणजेच अर्थाची प्रतीती होते, तो स्फोट होय. अल्पजीवी असा ध्वनिरूप शब्द ऐकल्याने अर्थाचा बोध होत नसून तो अविनाशी व अविभाज्य अशा वाक् तत्त्वामुळे म्हणजेच स्फोटामुळे होतो, वर्ण हे चिरंतर स्फोटाचा केवळ अविष्कार करतात. अशा रीतीने पतंजलींनी व्याकरणातील सूक्ष्मातिसूक्ष्म रहस्ये या भाष्यात उलगडली असून शब्दाच्या व्यापकतेवर प्रकाश टाकला आहे.


वेदव्यासांना ज्याप्रमाणे “भगवान व्यास” असे संबोधिले जाते तसेच पतंजलींचाही उल्लेख करतानाही “भगवान पतंजली’’ असे म्हटले जाते. पतंजलींची योगसूत्रे सुविख्यात आहेत. भारतीय अध्यात्माची जी महत्त्वाची ग्रंथसंपदा आहे, त्यात सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, पूर्व मीमांसा व उत्तरमीमांसा या सहा दर्शनांवरील सूत्रग्रंथांचाही समावेश होतो. त्यातील योगदर्शनाची सूत्रे पतंजलींनी लिहिली आहेत. आत्म्याचा परमात्म्याशी ज्या मार्गाने योग म्हणजेच संबंध जुळून येतो, त्या उपासनामार्गावर भगवान पतंजली आपल्या योगसूत्रांद्वारे साधकाला व्यवस्थित घेऊन जातात. त्यांनी आपल्या सूत्रांतून सांगितलेली योगाची यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही आठ अंगे इतकी अचुक आहेत की, त्यांना पूर्णपणे अनुसरणारा साधक ध्येय, ध्याता, ध्यान या त्रिपुटीला भेदणाऱ्या असंप्रज्ञात समाधीपर्यंत बरोबर जाऊन पोचतो.


योगश्चित्तवृत्तिनिरोध :


चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे योग, अशी योगाची अचूक व्याख्या पतंजली करतात. या चित्तवृत्तींचे अतिशय बारीकसारीक, सांगोपांग वर्णन पतंजलींनी केले आहे आणि त्यांचा निरोध करण्यासाठी जी साधने लागतात त्यांचेही सूक्ष्म विवेचन ते करतात. पतंजली वैदिक धर्म तसेच संस्कृत भाषेचे तसेच आर्यावर्ताचे अभिमानी होते. त्यांना मोक्षाइतकेच ऐहिक अभ्युदयाचे महत्त्व वाटत होते. या ऐहिक संपन्नतेसाठीच त्यांनी निरामय शरीर, स्वाधीन मन आणि प्रभुत्व गाजविणारी वाचा यांचा आपल्या अनमोल ग्रंथांद्वारे पुरस्कार केला आणि अखेर कैवल्यप्राप्ती हेच साध्य ते मानतात.


पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यं स्वरूपप्रतिष्ठा वा चितिशक्तिरिति ।। योगसूत्रे ४.३४


प्रखर योगसाधना करणारा योगी अखेर अशा उन्नत भूमिकेला पोहोचतो की त्याच्यासाठी धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे सर्व पुरुषार्थ कृतार्थ झालेले असतात. त्याला मिळविण्यासारखे काहीही राहत नाही, ज्या आत्मस्वरूपाच्या अनुभूतीसाठी त्याची साधना चालू असते, ते आत्मस्वरूपच तो होतो. हीच पुरुषार्थशून्यता होय. या अवस्थेत सत्त्व, रज, तम या त्रिगुणांचा लय होऊन पुरुष स्वस्वरूपात प्रतिष्ठित होतो, असा सिद्धान्त भगवान पतंजलींनी मांडला आहे.


प्रकृतीहून मी पुरुष वेगळा आहे, हा विवेक उत्पन्न होणे हाच मोक्ष, असे सांख्यदर्शनाप्रमाणे योगदर्शनातही मानले आहे आणि सांख्यदर्शनाप्रमाणेच योगदर्शनातही पुरुष म्हणजे आत्मे अनेक मानले आहेत. म्हणून भगवान व्यासांनी योगदर्शनातील त्या अनेकत्वाचे आपल्या उत्तरमीमांसेत खंडन केले आहे. मात्र भगवान पतंजलींनी आखून दिलेल्या अष्टांगयोगाचा सर्वांनीच गौरव केला आहे. कारण योग हे ब्रह्मज्ञानाकडे घेऊन जाणारे महत्त्वाचे साधन आहे.


चरकसंहितेचे मूळ नाव आत्रेयसंहिता असे होते. या संहितेचा उपदेशक अत्रिपुत्र पुनर्वसू व ग्रंथकर्ता अग्निवेश आणि प्रतिसंस्कारक चरक हे होत. चरक ही कृष्णयजुर्वेदाची एक शाखा होती. तिच्या अनुयायांनाही चरक म्हणत. हे चरक सामान्यतः आयुर्वेदज्ञ होते. पतंजली याच शाखेचे असल्याने त्यांनाही चरक म्हणत. पतंजली हे आयुर्वेदाचार्य होते. त्यांनी केलेले चरकसंहितेचे पुनर्संस्करण पातंजल वार्तिक या नावाने प्रसिद्ध आहे. पतंजलींना आयुर्वेदाची चांगली माहिती होती, हे त्यांच्या महाभाष्यावरून कळून येते. पतंजलीमुनींना चिकित्सा व रसायनशास्त्राचे आचार्य मानले जाते. रसायनाशास्त्रात त्यांनी अभ्रक, धातुयोग व लोहशास्त्र यांचा परिचय करून दिला. मानवी जीवनाला आखीवरेखीव आकार देऊन आत्मौन्नतीप्रत घेऊन जाणाऱ्या भगवान पतंजलींना शतशः नमन...!


anuradha.klkrn@gmil.com

Comments
Add Comment

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व

Chhatrapati Sambhajinagar News:हुंडा न दिल्यामुळे सुनेचा छळ ,महीलेनं विहीरीत पडुन मृत्यु..सासरच्यांनी रचला प्लॅन

छ.संभाजीनगर: संभाजीनगरमधील सिल्लोड तालूक्यतील पळशी येथे भंयकर प्रकरण बाहेर पडलं आहे.१९ वर्षीय करुणा निकमचे,

अखेर ठरले! कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, ठाण्यात महायुतीचाच महापौर होणार

मुंबई : महानगरपालिकांमधील सत्तासंघर्ष, मित्रपक्षांतील कुरघोड्या आणि पडद्यामागील राजकीय हालचालींनंतर अखेर

सर्वाधिक रोजगार निर्मितीत ईशा अंबानी ठरल्या क्रमांक एक उद्योजिका! 'Uth Series २०२५' मधील मोठी क्रमवारी समोर

मोहित सोमण: अवेंनडस वेल्थ व हुरून इंडिया यांनी युथ (Uth) सिरीज २०२५ केलेल्या उद्योजकांचा क्रमवारीत ईशा अंबानी यांनी

एकमेका साह्य करू। अवघे धरू सुपंथ ॥

कोण जाणे कैसी परी। पुढे उरी ठेविता ।। अवघे धन्य होऊ आता। स्मरविता स्मरण ॥ तुका म्हणे अवधी जोडी। वे आवडी चरणांची

पोळी-भात सोडता आता वजन करता येणार कमी! जाणून घ्या...

मुंबई : वजन कमी करायचं म्हटलं की सर्वात आधी भात, पोळी आणि बटाट्यांना रामराम ठोकावा लागतो, असा समज आजही अनेकांच्या