नागपूर : पुणे जिल्ह्यातील जुन्नर वनविभागात वन्यप्राणी बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर आज विधिमंडळात चर्चा झाली. सरकारने लेखी उत्तरात दिलेल्या माहितीनुसार, सन २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत बिबट्याच्या हल्ल्यात एकूण ५५ व्यक्तींचा मृत्यू झाला असून १५० व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये मोठी भीती पसरली आहे. याच कालावधीत, बिबट्याने पाळीव पशुधनाचेही मोठे नुकसान केले आहे. २००१ पासून नोव्हेंबर २०२५ पर्यंत २७ हजार ९५२ पशुधनाचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक आकडेवारी शासनाने सादर केली आहे.
बिबट्यांच्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण उपाययोजना
या वाढत्या हल्ल्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी शासनाने महत्त्वाच्या उपाययोजना करण्याची माहिती दिली आहे, केंद्र सरकारने प्रायोगिक तत्त्वावर बिबट्यांची नसबंदी करण्यास परवानगी दिली आहे. या अनुषंगाने पुढील कार्यवाही सुरू करण्यात येत आहे. बिबट्यांना बंदिस्त करण्यासाठी वनविभागाकडून पिंजऱ्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. जे बिबटे बंदिस्त केले जातील, त्यांचे राज्यातील इतर प्राणी संग्रहालये किंवा संरक्षित क्षेत्रांमध्ये सुरक्षितपणे स्थानांतरण केले जाईल. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्र तसेच राज्यातील इतर केंद्रांचे विस्तारीकरण करून त्यांची क्षमता वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि हल्ल्यांची पूर्वसूचना देण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) आधारित कॅमेरे आणि अनोइडर्स मशिन बसवण्याची उपाययोजनाही करण्यात येणार आहे.
जुन्नर वनविभाग आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांचे जीव व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी या उपाययोजनांची अंमलबजावणी किती प्रभावी ठरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.