खासदार डॉ. हेमंत सवरा यांना यश
पालघर : महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाशी निगडित तीन महत्त्वपूर्ण विधयके खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा यांनी संसदेत मांडले आहेत. राज्याच्या क्रीडा, पर्यटन व जलस्रोत संवर्धन क्षेत्राला मोठी चालना देणारे हे प्रस्ताव असून, पालघर जिल्ह्याच्या विकासात्मक दृष्टिकोनातून सुद्धा हे प्रस्ताव महत्त्वपूर्ण असणार आहेत.
महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे क्रीडा शिक्षण उपलब्ध होण्यासाठी क्रीडा विज्ञान, क्रीडा तंत्रज्ञान, क्रीडा व्यवस्थापन आणि क्रीडा प्रशिक्षकत्व या क्षेत्रांमध्ये उच्च गुणवत्तेचे शिक्षण सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात क्रीडा विद्यापीठ निर्माण करणे गरजेचे आहे. याबाबत खासदार सवरा यांनी संसदेत विधेयक मांडले. या विधेयकाद्वारे राज्यात राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम पद्धती आत्मसात केल्या जातील. राज्यात आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि सक्षम क्रीडा शिक्षणव्यवस्था उभारली जाईल. देशाला ११ हजार किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे. या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यांचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधण्यासाठी किनारपट्टी पर्यटन सुविधांचा विकास,पायाभूत सोयीसुविधांचे जाळे निर्माण करणे आणि स्थानिक रोजगारनिर्मिती यांना चालना देण्यासाठी ‘कोस्टल टुरिझम डेव्हलपमेंट बोर्ड’ स्थापन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित करण्यात आली. तसेच राज्यातील जलस्रोतांचे संवर्धन, पुनरुज्जीवन, टिकाऊ व्यवस्थापन या महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून विशेष आर्थिक सहाय्य देण्याची मागणी सुद्धा खासदार सवरा यांनी संसदेत केली आहे.