नागपूर : भूमाफियांनी राज्यातील देवस्थानांच्या शेकडो एकर शेतजमिनी हडपल्याने त्यांच्या संरक्षणासाठी गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा’ लागू करावा, अशी मागणी करीत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या प्रतिनिधींनी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
नागपूर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंदिर महासंघाच्या वतीने ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा करावा, सॅनबॅनवर बंदी घालावी, तसेच मंदिरांचे मुद्रांक शुल्क माफ करावे, अशा मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या वेळी मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट, हिंदु जनजागृती समितीचे अभिजीत पोळके उपस्थित होते. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिन्ही निवेदनांचा विषय समजावून घेतला, तसेच पुढील कार्यवाहीसाठी सदरचे निवेदन सचिवांना पाठवून दिले.
देवस्थानांच्या जमिनी वाचवण्यासाठी गुजरात आणि कर्नाटकच्या धर्तीवर ‘अँन्टी लँड ग्रॅबिंग (प्रतिबंध) कायदा’ तात्काळ लागू करावा, तसेच विशेष अन्वेषण पथके (एस्.आय.टी.) स्थापन करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.