नागपूर : कारंजा (वर्धा) परिसरातील दुर्गम भागात अवैधरित्या उभारण्यात आलेला ‘मेफेड्रोन’ निर्मितीचा कारखाना मंगळवारी (दि. ९ डिसेंबर) उद्ध्वस्त करण्यात आला. महसूल गुप्तचर संचालनालय (डी.आर्.आय.) यांनी ही कारवाई केली. मात्र पोलीस विभाग अनभिज्ञ होता. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा मुद्दा आर्वीचे भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी बुधवारी विधानसभेत उपस्थित केला.
या कारवाईच्या वेळी जवळपास १९२ कोटी रुपये किमतीचे १२८ किलो मेफेड्रोन, २४ किलो प्रीकर्सर रसायने, कच्चा माल आणि यंत्रसामग्री जप्त करण्यात आली होती. या प्रकरणी ३ जणांना अटक करण्यात आली आहे. ‘ऑपरेशन हिन्टरलँड ब्लू’ अंतर्गत अमली पदार्थविरोधी मोहीम राबवण्यात येत आहे. याच सुमारास वर्धा जिल्ह्याच्या कारंजा (घा.) परिसरातील दुर्गम भागात अमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना उभारण्यात आल्याची गुप्त माहिती ‘डी.आर्.आय.’च्या अधिकार्यांना मिळाली. या आधारावर शोध मोहीम राबवण्यात आली. प्रथमच अशी मोठी कारवाई झाली. असा कारखाना जिल्ह्यात चालू असतांना पोलीस विभागाला याची कल्पना कशी नव्हती? हा मोठा प्रश्न आहे. याची सभागृहाने नोंद घ्यावी, अशी मागणी वानखेडे यांनी केली. युवा पिढीचे भविष्य अधारांत टाकणारा हा प्रकार आहे, असेही ते म्हणाले.