कोकणातील रस्त्यांच्या दूरवस्थेवरून आमदार निलेश राणे विधानसभेत कडाडडले
नागपूर : कोकणातील रस्त्यांची सातत्याने होणारी दुरवस्था आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदार कारभारावर शिवसेना आमदार निलेश राणे यांनी मंगळवारी विधानसभेत जोरदार हल्लाबोल केला. औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना राणे यांनी, कोकणातील सरासरी ४ हजार मिलिमीटर पावसाचा दाखला देत, विदर्भ आणि मराठवाड्यातील कमी पावसाच्या भागाचे रस्तेनिर्मितीचे निकष कोकणाला लावू नयेत, अशी आग्रही मागणी केली.
आ. राणे म्हणाले, यंदा १९ मे ते ९ नोव्हेंबर असे सहा महिने कोकणात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. अशा परिस्थितीत रस्त्यांची अवस्था काय असेल, याचा विचार करा. आम्ही कंत्राटदारांना विचारले तर उत्तर नाही, अधिकाऱ्यांना विचारले तर उत्तर नाही. सहा महिने पाऊस पडला म्हणून सगळे ढगांकडे बोट दाखवतात. कदाचित अजून पाऊस पडेल या अपेक्षेवर अधिकारी-कंत्राटदार बसले आहेत, अशा शब्दांत राणे यांनी संताप व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने मागची देयकेही अद्याप अदा केलेली नाहीत. पैसे आले तरी मागची बिले काढली नाहीत, त्यामुळे नवीन कामे घ्यायची की नाही असा प्रश्न कंत्राटदारांना पडला आहे. महामार्गांचीही हीच अवस्था आहे. डांबरी रस्ते पूर्णपणे उखडल्याने अपघातांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
कोकणासाठी रस्ते निर्मितीचे निकष बदला
कोकणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते, वाळू वाहतूकही होते. असे असताना कमी पावसाच्या विदर्भ-मराठवाड्यातील रस्तेनिर्मितीचे निकष कोकणाला लावले जात असल्याने रस्ते टिकतच नाहीत, असे राणे यांनी सांगितले. ४ मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या भागाचे निकष ४ हजार मिलिमीटर पाऊस पडणाऱ्या कोकणाला लावणार असाल, तर हे रस्ते कसे टिकतील? दरवर्षी तोच तो रस्ता दुरुस्ती करत बसायचे का? या प्रकरणात काही कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे लागेल, काही अधिकाऱ्यांचा बंदोबस्त करावा लागेल, अशी थेट कारवाईची मागणीही त्यांनी केली.