नवी दिल्ली : बांगलादेश सरकार भारतात राहणाऱ्या त्यांच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना ढाकाला परत पाठवण्याची (प्रत्यार्पणाची) मागणी करत आहे. याबाबत आता भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी मोठे विधान केले आहे. भारतात राहणे हा शेख हसीना यांचा वैयक्तिक निर्णय आहे आणि त्या निर्णयामागे बांगलादेशातील परिस्थिती कारणीभूत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
एका कार्यक्रमादरम्यान जेव्हा परराष्ट्रमंत्र्यांना विचारण्यात आले की, शेख हसीना जितका काळ इच्छितात तितका काळ भारतात राहू शकतात का, तेव्हा त्यांनी उत्तर दिले, “हा वेगळा प्रश्न होता. त्या काही खास परिस्थितींमध्ये येथे आल्या, पण निर्णय त्यांनाच घ्यावा लागेल.” परराष्ट्र मंत्र्यांनी हेही स्पष्ट केले की भारत हा बांगलादेशचा शुभचिंतक आहे.
भारत-बांगलादेश संबंधांबद्दल बोलताना जयशंकर म्हणाले की, बांगलादेशच्या विद्यमान नेतृत्वाने मागील निवडणुकीबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांनी सांगितले की, जर मुद्दा निवडणुकीचा असेल, तर सर्वप्रथम निष्पक्ष निवडणुका होणे अत्यावश्यक आहे. परराष्ट्र मंत्र्यांनी यावर जोर दिला की,भारताला बांगलादेशात स्थिरता आणि लोकशाहीची वैधता टिकून राहावी असे वाटते. पुढे त्यांनी सांगितले त्यांना विश्वास आहे की बांगलादेशातील लोकशाही प्रक्रियेतून जेही नेतृत्व पुढे येईल, ते भारताशी असलेल्या संबंधांविषयी संतुलित आणि परिपक्व दृष्टिकोन ठेवेल, ज्यामुळे परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. शेख हसीना यांची सत्ता गेल्यानंतर भारत–बांगलादेश संबंधांमध्ये किंचित तणाव निर्माण झाला आहे, हेही त्यांनी मान्य केले. गेल्या महिन्यातच बांगलादेशात मानवतेविरुद्ध गुन्ह्यांसाठी शेख हसीना यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बांगलादेश सरकारच्या मागणीवर भारत सरकारने अद्याप कोणताही अधिकृत प्रतिसाद दिलेला नाही.