मुंबई : देशातील सर्वात स्वस्त विमानसेवा म्हणून मिरवणाऱ्या इंडिगो कंपनीची आठवड्याभरात काही हजार उड्डाणं रद्द झाली आहेत. कोणी कौटुंबिक कारणामुळे तर कोणी मुलाखत देण्यासाठी अथवा परीक्षेसाठी वा कामाच्या ठिकाणावर जाण्यासाठी म्हणून विमान प्रवास करत होते. कोणी लग्न, साखरपुडा आदी शुभकार्यांसाठी प्रवास करत होते. काही जण वैद्यकीय उपचारांसाठी विमानाने जात होते. पण सर्वांचे प्रवासाचे नियोजन कोलमडले कारण इंडिगोनं प्रचंड गोंधळ घातला. या गोंधळाची गंभीर दखल केंद्र सरकारने तसेच डीजीसीएने घेतली आहे. डीजीसीएने नोटीस बजावताच इंडिगोने अनेक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देऊन प्रवाशांची जाहीर माफी मगितली आहे.
आता प्रवाशांनी काळजी करण्याची गरज नाही. फ्लाईट उशिरा येणार असेल किंवा रद्द झाली असेल, तर इंडिगो प्रवाशांना संपूर्ण रिफंड किंवा फ्लाईट री-शेड्युल करण्याची सुविधा सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देत आहे.
रिफंड आणि री-शेड्युलिंग करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. प्रवाशांनी सर्वप्रथम इंडिगोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ‘सपोर्ट’ या पर्यायावर क्लिक करायचे. त्यानंतर ‘प्लॅन बी’ हा पर्याय निवडल्यावर फ्लाईट बदलणे, तिकीट रद्द करणे किंवा रिफंड मिळवणे हे तीनही पर्याय उपलब्ध होतात. प्रवासी त्यांचा PNR/बुकिंग नंबर आणि ईमेल आयडी किंवा अंतिम नाव टाकल्यानंतर त्यांना दोन पर्याय मिळतात फ्लाईट री-शेड्युल करणे किंवा फ्लाईट रद्द करून पैसे परत घेणे. आवश्यक असल्यास प्रवासी नवीन तारीख किंवा वेळ निवडून त्यांचे प्रवास नियोजन बदलू शकतात.
रिफंडची विनंती स्वीकारल्यानंतर साधारणतः सात कामकाजाच्या दिवसांत रक्कम संबंधित बँक खात्यात जमा होते. तिकीट जर कोणत्याही ट्रॅव्हल एजन्सीतून बुक केले असेल, तर रिफंडसाठी प्रवाशांना त्या एजन्सीशी संपर्क साधावा लागेल.
सरकारकडून कडक सूचना मिळाल्यानंतर इंडिगोने रिफंड आणि प्रवासी सहाय्याची प्रक्रिया अधिक गतीने सुरू केली आहे. कंपनीने आतापर्यंत ६१० कोटी रुपये रिफंडच्या स्वरूपात परत केले असल्याचे सांगितले आहे. तसेच रद्द झालेल्या किंवा खूप उशिर झालेल्या फ्लाईट्सच्या री-शेड्युलिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. प्रवाशांना मदत करण्यासाठी विशेष सपोर्ट सेल्स तयार करण्यात आले असून देशभरातील सुमारे ३००० गहाळ बॅगा संबंधित प्रवाशांना परत करण्यात आल्या आहेत; असेही इंडिगोने सांगितले आहे.