बांधकामाचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव अॅपवर समजणार
मुंबई : मुंबईतील अनधिकृत झोपड्यांच्या समस्येवर नियंत्रण आणण्यासाठी आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने मोठे पाऊल उचलले आहे. अनधिकृपणे उभ्या राहणाऱ्या झोपड्यांवर ‘नेत्रम’ या खास पोर्टलच्या माध्यमातून वॉच ठेवले जाणार आहे. यामुळे मुंबई पालिका, जिल्हाधिकारी आणि म्हाडासह विविध प्राधिकरणांच्या जागांवर नव्याने होणाऱ्या अनधिकृत बांधकामांचा शोध घेऊन तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.
झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण मुंबईला झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. त्यानसार खासगी विकसक, सरकारी आस्थापनांच्या माध्यमातून झोपडीधारकांचे पुनर्वसन केले
जात आहे. त्यामुळे झोपड्यांची संख्या कमी होणे अपेक्षित असतानाही त्यामध्ये वरचेवर भर पडत आहे. त्याची गंभीर दखल घेत एसआरए प्राधिकरणाने मुख्य अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गादर्शनाखाली नव्याने उभा राहणाऱ्या अनधिकृत झोपड्यांवर नजर ठेवता यावी, त्याचा शोध घेऊन सहजपणे कारवाई करता यावी म्हणून भास्कराचार्य नॅशनल इन्स्टट्युट ॲण्ड जिओ-इन्फॉर्मेटिक्स इन्स्टिट्यूटच्या (बीआयएसएजी-एन) या गुजरातमधील तांत्रिक संस्थेच्या मदतीने नेत्रम हे पोर्टल विकसित केले असून, ते लवकरच कार्यरत केले जाणार आहे. त्यासाठी एसआरए मुख्यालयात नेत्रम कक्ष सुरू केला आहे. त्यामुळे कोणत्या ठिकाणी कधी अनधिकृत झोपड्या उभा राहिल्या आहेत, त्याचे प्रमाण किती आहे ही माहिती सहजपणे कार्यालयात बसून पोर्टलवर पाहता येणार असल्याची माहिती एसआरएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
नेत्रमचे कार्य आणि कारवाई प्रक्रिया
नेत्रम पोर्टल एक मोबाईल ॲपशी संलग्न असेल, ज्यामुळे कारवाईची प्रक्रिया जलद होईल. पोर्टलशी संलग्न मोबाईल ॲप अधिकाऱ्यांच्या मोबाईलमध्ये उपलब्ध असेल.अधिकारी ठरवून दिलेल्या कार्यक्षेत्रात नेव्हिगेशनच्या आधारे अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करू शकतील. अनधिकृत बांधकामाचे मोजमाप, त्याचे फोटो, बांधकाम करणाऱ्या व्यक्तीचे नाव इत्यादी माहिती मोबाईल ॲपवर भरून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केली जाईल. वरिष्ठ अधिकारी आलेल्या माहितीची पोर्टलवरील माहितीशी पडताळणी करून बांधकाम मालकाच्या नावाने कारवाईची ऑनलाइन नोटीस तत्काळ काढू शकणार आहेत.