श्रीवर्धन : पाच महिने उलटूनही समुद्र शांत नसल्याने रायगडातील मच्छिमारांचा मत्स्यहंगाम मंदावलेला असून सलग निसर्ग, गुलाब, शक्ती वादळांच्या तडाख्यामुळे भरडखोल, श्रीवर्धन, बागमंडला, मेंदडी, दिघी, जीवना बंदर, मुळगाव, वाशी, दिवेआगर, शेखाडी, कुडगाव या किनाऱ्यांवर उपजीविकेचे गंभीर संकट निर्माण झाले आहे.
उंच लाटा, अस्थिर हवामानामुळे बोटी नांगरून ठेवाव्या लागत असून डिझेल, बर्फ, दुरुस्तीचे खर्च आकाशाला भिडले आहेत. “समुद्रात गेलो तर प्राण जातो; नाही गेलो तर लेकरं उपाशी मरतात” अशी मच्छिमारांची हृदयद्रावक अवस्था असून मत्स्यव्यवसाय ठप्प झाल्याने बर्फ कारखाने, वाहतूक व्यवसाय, रिक्षा–टेम्पो चालक, बाजारपेठ, व्यापारी, हातगाडीवाले, महिला मच्छीविक्रेत्या सर्वांवर उपजीविकेचे मोठे संकट ओढवले आहे. एका मच्छिमाराचे जाळे थांबले की शंभर घरांची भांडी रिकामी होण्याची परिस्थिती निर्माण झाली असून मच्छिमार बांधवांनी डिझेल सवलत तात्काळ लागू करणे, बोट-जाळी दुरुस्ती अनुदान वाढ, थकबाकी कर्जमाफी, आपत्ती निवारक निधीतून आर्थिक मदत, बंद हंगामातील जीवनावश्यक भत्ता पुन्हा सुरू करणे आणि कोकणसाठी विशेष ‘मत्स्यव्यवसाय आपत्ती पॅकेज’ जाहीर करण्याच्या तातडीच्या मागण्या केल्या आहेत.
सागर शक्ती संघटनेचे अध्यक्ष हरिदास वाघे यांनी मच्छिमारांना कृषीसारखेच सवलतीचे दर देऊन फिशरीज विद्यापीठाचे केंद्र श्रीवर्धनमध्ये करण्याची मागणी केली आहे; कोकण मच्छिमार संस्थेचे चेअरमन इम्तियाज कोकाटे यांनी डिझेल सवलत, कर्जमाफी, बोट-जाळी अनुदान वाढ, बंद हंगाम भत्ता तात्काळ मंजूर करण्याचे आवाहन केले आहे.श्रीकृष्ण मच्छिमार संस्थेचे चेअरमन भारत चोगले यांनी पाच महिन्यांच्या बंद हंगामामुळे मच्छिमार कुटुंबे उपासमारीच्या दरीत ढकलली गेल्याचे सांगत विशेष पॅकेज तत्काळ देण्याची मागणी केली असून खासदार, मंत्री, आमदारांनी एकत्रितपणे दबाव आणून मच्छिमारांना दिलासा मिळवून द्यावा, ही संपूर्ण कोकणातील मच्छिमारांची आर्त हाक आहे.