तलावाभोवतीचे सुरक्षा कठडे तुटलेले
जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या उखडलेल्या
मुंबई (सचिन धानजी): मुंबई महानगरपालिकेने वांद्रे पश्चिम येथील ऐतिहासिक तलावाचे सुमारे दहा वर्षांपूवी नूतनीकरण करून स्थानिक जनतेला एक पर्यटनस्थळ उपलब्ध करून दिले होते. परंतु आज स्वामी विवेकानंद सरोवर अर्थात वांद्रे तलावाची अवस्था अत्यंत बकाल झाली असून यातील पाणी शेवाळयुक्त हिरवेगार आणि तलावाच्या बाजुला लावलेले सुरक्षा कठडेही तुटले गेलेले आहेत. तसेच जॉगिंग ट्रॅकवरील लाद्याही तुटल्या गेल्याने या तलावाची दुर्दशा झाल आहे. त्यामुळे हे तलाव दुर्लक्षित बनलेले असताना याच्या डागडुजीकडे किंवा त्यांच्या नुतनीकरणाकडे महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष दिसत नाही.
वांद्रे पश्चिम येथील लोट्स टँक,मोठा सरोवर तसेच स्वामी विवेकानंद सरोवर असे नाव असलेले वांद्रे तलाव हे पुरातन वास्तू क्षेत्रातील दोन श्रेणीमध्ये मोडत असून दहा वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून या तलावाला मुहूर्तस्वरुप देण्यात आले होते. साडे सात एकर जागेतील या तलावाच्या नुतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर याची योग्यप्रकारे देखभाल न झाल्याने आज या तलावाला बकाल स्थिती निर्माण झाल आहे.
या तलावातील कारंजे बंद असून शेवाळयुक्त हिरवे पाणी त्यात दिसून येत आहे. पाण्यावर शेवाळ आणि कचऱ्याचा थर साचलेला आहे. त्यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात दुर्गंधी पसरलेली आहे. तलावाभोवती असलेले जॉगिंग ट्रॅकवरील लाद्या, बसण्यासाठीची बाके आणि कठडे तुटलेले आहेत. काही ठिकाणी संरक्षक भिंत ढासळण्याच्या अवस्थेत आहे. तसेच पाथ वे शेजारील तलावाचे संरक्षक कठडे तुटून पडल्याने येथून चालणाऱ्या, फिरणाऱ्या नागरिकांचा पडून अपघात होण्याची शक्यता आहे. नूतनीकरणाच्या वेळी लावण्यात आलेले शोभेचे दिवे आणि कारंजेही निकामी झाले आहेत. या तलावाच्या शेजारील जागेत रस्त्यालगत नवीन पर्जन्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे, तर तलावाची बकाल स्थिती झाल्याने नागरिकांना याच्या आसपासही फिरण्याची इच्छा होत नाही.स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव परिसरात वाढला आहे, तसेच यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पालिका प्रशासनाने त्वरित या तलावाची पुन्हा एकदा स्वच्छता आणि दुरुस्ती करावी अशीच मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
नव्याने जलवाहिनी टाकण्यासाठी काँक्रिट केलेला रस्ता खोदण्याचा प्रताप नवीन केलेला रस्ता खोदायला दिला जाणार नाही,या आयुक्तांसह अतिरिक्तांच्या ...
वांद्रे तलावाचा काय आहे इतिहास
वांद्रे तलाव १८००च्या दशकाच्या सुरुवातीला म्हणजे सुमारे २०० वर्षांपूर्वी बांधलेला आहे. सुरुवातीला हा तलाव 'लोटस टँक' या नावाने ओळखला जात असे, कारण एकेकाळी त्याचे पाणी कमळे आणि जलपर्णींनी भरलेले असायचे. याला स्थानिक लोक 'मोठा सरोवर' असेही म्हणत असत. कालांतराने या तलावाची देखभाल मुंबई महानगरपालिकेकडे सोपवण्यात आली. महापालिकेने सन १९८७ मध्ये याचे अधिकृत नामकरण करून 'स्वामी विवेकानंद सरोवर' असे नाव दिले. तरीही हा तलाव आजही वांद्रे तलाव म्हणून ओळखले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार सन १९९० च्या दशकात हा तलाव वांद्रेकरांसाठी एक आकर्षक केंद्र बनला होता. त्यावेळी येथे नागरिकांसाठी पॅडल बोटीची सोय उपलब्ध होती. तसेच, या तलावात मत्स्यपालन उपक्रमही चालवले जात होते,असेही त्यांचे म्हणणे आहे.