वॉशिंग्टन डीसी : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादीमीर पुतिन हे दोन दिवस भारताच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात अनेक महत्त्वाचे करार झाले. यामुळे अस्वस्थ झालेल्या अमेरिकेने आता एक नवे धोरण राबवण्याचा निर्णय घेतला आहे. ट्रम्प प्रशासनाने तयार केलेल्या नव्या धोरणामुळे एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने केलेल्या घोषणेनुसार आता एम्प्लॉयमेंट ऑथोरायझेशन डॉक्युमेंट्सची कमाल वैधता कमी करण्यात येणार आहे. देशाची अंतर्गत सुरक्षा मजबूत करण्यासाठी तसेच संभाव्य धोके कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या नियमानुसार अमेरिकेमध्ये ज्याला काम करण्याची इच्छा आहे किंवा ज्याने अमेरिकेकडे तशी परवानगी मागितली आहे, अशा व्यक्तीची आता कडक आणि वारंवार तपासणी होणार आहे. ज्यामुळे जर एखाद्या व्यक्तीपासून देशाला धोका असेल तर त्याची माहिती आधीच मिळेल असे अमेरिकेचे म्हणणे आहे.
अमेरिकेच्या नव्या धोरणाचा सर्वाधिक प्रतिकूल परिणाम एच वन बी व्हिसा घेऊन अमेरिकेत गेलेल्या अनेक भारतीयांवर होणार आहे. नवे धोरण अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या अनेक भारतीयांसाठी धोक्याची घटा ठरू शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे.