सुमित्रा महाजन या इंदूरच्या माजी खासदार आहेत. त्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत लोकसभेचे अध्यक्षपद अत्यंत कुशलतेने आणि यशस्वीरित्या सांभाळले होते. या उल्लेखनीय कार्यासाठीच त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले होते. आता माजी लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांना 'ब्रह्मभूषण’ २०२५ पुरस्काराने गौरविले जाणार आहे. या सोहळ्यास माजी खासदार आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार वितरण सोहळा बुधवार १० डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सात वाजता दादर पश्चिम येथील भवानी शंकर रोडवरच्या ब्राह्मण सेवा मंडळाच्या तळमजल्यावरील सभागृहात होणार आहे.
ब्राह्मण सेवा मंडळ या संस्थेने २०१६ या शतकमहोत्सवी वर्षापासून समाज जीवनाशी निगडित विविध क्षेत्रांपैकी दरवर्षी एक क्षेत्र निवडून त्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्ञातीतील मान्यवर व्यक्तींपैकी एकाचा 'ब्रह्मभूषण’ पुरस्कार देऊन गौरव करण्यास सुरुवात केली. 'ब्राह्मण सेवा मंडळा'ने प्रथम २०१६ साली 'ब्रह्मभूषण पुरस्कार' इतिहासकार आणि महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांना प्रदान केला. त्यानंतर २०१७ सालचा हा पुरस्कार भारतीय सेनेत कार्यरत असलेले लेफ्ट जनरल डॉ. डी. बी. शेकटकर यांना प्रदान केला गेला होता.
जेष्ठ वैद्यकीय आणि न्युक्लिअर मेडीसीन व न्युक्लिअर कार्डीओलॉजीचे भारतातील प्रणेते डॉ. रामचंद्र दत्तात्रय लेले यांना २०१८ साली प्रदान केला. तर २०१९ साली खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांना प्रदान करण्यात आला.