मुंबई : दिल्लीत लाल किल्ल्याजवळ कारबॉम्बचा स्फोट करण्यात आला होता. ही घटना ताजी असतानाच मुंबईत विलेपार्ले स्थानकाजवळ एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. या बॅगबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलीस पथक पोहोचले आहे.
विलेपार्ले पूर्व येथे दिनानाथ नाट्यगृहाजवळ उतरणाऱ्या पुलावर अर्थात पब्लिक ब्रिजवर एक बॅग बेवारस स्थितीत आढळली. पोलिसांनी ही बॅग तपासली. बॅगेत बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्यामुळे बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाला अर्थात बीडीडीएसला (Bomb Detection and Disposal Squad or BDDS) बोलावण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून भोवतालचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. बीडीडीएसचे पथक तपासणी करेल आणि धोकादायक वस्तू आढळल्यास ती निकामी करेल, अशी माहिती पोलिसांनी प्रसारमाध्यमांना दिली.
नागरिकांनी कुठेही बेवारस स्थितीत वस्तू आढळल्यास त्याबाबतची माहिती पोलिसांना द्यावी पण परस्पर त्या वस्तूला हात लावू नये; असे आवाहन पोलिसांनी केले आहे.