राजरंग : राज चिंचणकर
नाट्यसृष्टीत प्रायोगिक व व्यावसायिक असे दोन प्रवाह असल्याचे साधारणतः मानले जाते. पण त्याही पलीकडे अजून एक रंगभूमी या क्षेत्रात अस्तित्त्वात आहे मात्र तिचा प्रचार आणि प्रसार फार झालेला नाही. ही रंगभूमी म्हणजे 'दिव्यांग रंगभूमी'. काही नाट्यवेडी मंडळी सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून या रंगभूमीसाठी काम करत आहेत. दिव्यांग कलाकारांना घेऊन काही वेगळे प्रयोग करण्याचे प्रयत्नही यातून होत असतात. कलाक्षेत्रात कार्यरत असलेला नेपथ्यकार डॉ. सुमित पाटील हा अशाच दिव्यांग कलाकारांना घेऊन नाटक करण्यासाठी कायम प्रयत्नशील असतो. आता 'ऊन पाऊस' हे नाटक घेऊन तो रंगभूमीवर आला आहे. जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग अमर हिंद मंडळातर्फे आयोजित करण्यात आला. या नाटकाचे लेखन सारिका येवले-ढेरंगे हिने केले असून, दिग्दर्शन व नेपथ्याची जबाबदारी डॉ. सुमित पाटील याने सांभाळली आहे. हे नाटक विजू माने रंगभूमीवर सादर करत आहेत. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना आणि अपर्णा गुराम यांची वेशभूषा या नाटकाला लाभली आहे. योगिता तांबे व कविकिरण पाटील हे कलाकार या नाटकात भूमिका रंगवत आहेत. या नाटकाच्या निमित्ताने कलासक्त कलाकारांच्या ऊन-पावसाची कथा रंगभूमीवर साकार झाली आहे.
दिव्यांग कलाकारांच्या आयुष्याचे प्रतिबिंब म्हणावे, अशा पद्धतीने हे नाटक लिहिले गेले आहे. त्या दृष्टीने 'ऊन पाऊस' या नाटकाची लेखिका सारिका येवले-ढेरंगे तिच्या या लेखनाविषयी बोलताना म्हणते, "हे नाटक लिहिताना, दोनच कलाकार माझ्याकडे आहेत, असे सुमित पाटील मला म्हणाला होता आणि त्यांच्यावर आपण काही लिहू शकतो का, असे त्याने विचारले होते. त्यामुळे दिव्यांग कलाकार डोळ्यांसमोर होतेच. मग त्यानंतर आस्तिक-नास्तिक या विषयावर आमची चर्चा झाली. वास्तविक हे सर्व करताना खूप मर्यादा होत्या. दोन पात्रे, दिव्यांग कलाकार आणि त्यातही आस्तिक-नास्तिक हा विषय; यामुळे हे एक आव्हान होते. हे लेखन ठरवूनच केलेले आहे. दोन पात्रांना घेऊन काय करता येईल, हा विचार यामागे होता. वास्तवात म्हटले तर तो माझाच प्रवास आहे. नास्तिकतेपासून आस्तिकतेकडे झालेला आणि मला असे वाटले की तो सर्वांपर्यंत पोहोचायला हवा. हे नाटक सुद्धा नास्तिकतेकडून आस्तिकतेकडे जाणारा प्रवास करते. महत्त्वाचे म्हणजे आयुष्य जगताना आपला दृष्टिकोन कसा असायला हवा, हे सर्वकाही हे नाटक सांगते. आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बरोबर आहे का, हे तपासून पाहण्यासाठी सर्वांनी हे नाटक पाहावे, असे मला वाटते".
'ऊन पाऊस' हे नाटक रंगभूमीवर आणताना या टीमला अनेक आव्हाने पेलावी लागली असणार यात शंका नाही. या नाटकाचा दिग्दर्शक डॉ. सुमित पाटील याच्याशी या नाटकाबद्दल 'राजरंग' कॉलमसाठी चर्चा करत असताना त्याने एकूणच दिव्यांग रंगभूमी, दिव्यांग कलाकार आणि त्या संदर्भाने येणाऱ्या काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श केला. त्याच्याशी साधलेला हा विशेष संवाद...
'ऊन पाऊस' हे एक वेगळ्या धाटणीचे नाटक घेऊन तू रंगभूमीवर आला आहेस. हे नाटक करावे असे का वाटले?
जे दिव्यांगांच्या आयुष्यात खूप वेगवेगळे प्रश्न असतात. आपल्यासमोर फक्त त्यांचे प्रश्न येतात; त्यांची उत्तरे कधीच येत नाहीत. पण मला असे वाटते की याची उत्तरे त्यांच्याकडेच असतात आणि ते जर पॉझिटिव्हिटली वागले तर त्यांचा स्वतःच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. यातून त्यांच्यापुढे जे प्रश्न आहेत, ते सुटत जातील. समजा जर ते प्रश्न त्या-त्या वेळेला सुटले तर नक्कीच त्यांना त्यातून पुढे जाता येईल आणि त्यांना पुढे काहीतरी गाठता येईल; असे जेव्हा मी या नाटकातल्या दोघांबरोबर काम करायचे ठरवले तेव्हा वाटले. या नाटकात योगिता तांबे आणि कविकिरण पाटील हे कलाकार काम करत आहेत. योगिता पूर्णतः दृष्टीहीन आहे आणि कविकिरण पाटील हा पूर्णतः पाय नसलेला कलाकार आहे. मला असे वाटते की या दोघांमध्ये ज्या उणीवा आहेत; त्या त्यांनी नाटकात त्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून बदलून टाकलेल्या आहेत.
या नाटकाची निर्मिती प्रक्रिया कशा पद्धतीची होती?
हे नाटक लिहिण्याची सारिका येवले-ढेरंगे हिच्यासोबत जेव्हा प्रक्रिया सुरू झाली होती; तेव्हा मी आणि सारिका वेगवेगळ्या सार्वजनिक गणपतींच्या मंडपांत भेटत होतो. कारण तेव्हा मी गणपती मंडपांत सेट लावत होतो. मुळातच मी अशाप्रकारचे सेट लावत असताना आणि सामाजिक विषयांवर बोलत असताना, सारिका तिथे येत होती. सेट लावताना ती बघत होती आणि त्यातून आम्ही आस्तिक-नास्तिक हा विषय घेतला. यातून सकारात्मकता आणि नकारात्मकता कशी असते, हे दाखवण्याचा प्रयत्न करत गेलो. हे सर्व जेव्हा सुरू होते; तेव्हा मला असे वाटत होते की आमचे दोघे कलाकार वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. योगिता विविध प्रकारची वाद्ये वाजवते आणि कविकिरण लेखक व गीतकार आहे. त्यामुळे या दोघांच्या अॅबिलिटीना घेऊन या नाटकाची गुंफण सुरू झाली. मला असे वाटते की त्यांच्या वाट्याला येणाऱ्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी कला हेच एक माध्यम आहे; ज्यातून ते लोकांसमोर व्यक्त होऊ शकतात, लोकांसमोर येऊ शकतात.
दिव्यांग रंगभूमीचे सध्याचे स्थान काय?
गेल्या अनेक वर्षांपासून दिव्यांग रंगभूमी पूर्णपणे बंद झालेली आहे. ही रंगभूमी पुन्हा सुरू व्हावी, यासाठी गेली अनेक वर्षे मी प्रयत्न करत आहे. यासाठी मी सतत नवीन नाटक करण्याचा प्रयत्न करत असतो. यंदाचे आमचे नाटक आहे 'ऊन पाऊस'.
या नाटकाचे कथासूत्र काय आहे?
आपल्या आयुष्यातही ऊन आणि पाऊस असतो. खूप पाऊस आला तरी आपल्याला उन्हाची गरज भासते आणि खूप ऊन आले तरीपण पावसाची गरज भासते. या दोन्ही गोष्टी एकमेकांसाठी जशा पूरक आहेत; तशाच त्या आयुष्यासाठीही पूरक आहेत, हे दाखवून देणारे वेगळ्या पद्धतीचे हे नाटक आहे. दिव्यांग रंगभूमीसाठी काहीतरी योगदान असण्याच्या भावनेतून हे नाटक आम्ही केले आहे.
दिव्यांग रंगभूमीसाठी नाटक करताना कोणता विचार करावा लागतो?
आपल्याकडे जी काही थिएटर्स आहेत, त्यात दिव्यांगांसाठी एक्सेसिबिलिटी नाही. एक्सेसिबिलिटी हा सगळीकडे असणारा प्रॉब्लेम आहे; म्हणजे आम्ही कुठल्याही थिएटरला गेलो; तर तिथे कुठेच रॅम्प नसतात. त्यामुळे आमची व्हीलचेअर सेटवर नेणे म्हणजे ती उचलूनच न्यावी लागते. पण याविषयी आम्ही जागृती करायला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर फोल्डेबल रॅम्प सुद्धा आम्ही बनवायला सुरुवात केली आहे. ज्या थिएटर्समध्ये आम्ही जातो; तिथे आम्ही एखादा रॅम्प घेऊन जातो आणि नंतर तो तिथेच सोडून देतो.
कारण आमच्या नंतरही तिथे कोणी दिव्यांग कलाकार आले, तर त्याचा त्यांना उपयोग व्हावा. त्यामुळे अशी ऍक्सेसिबिलिटी पसरवणे हे सुद्धा आमचे उद्दिष्ट आहे. हे महत्त्वाचे काम आहे आणि नाटकाच्या माध्यमातून ते होत राहणार आहे.
या कलाकारांसोबत काम करताना कोणती आव्हाने असतात?
असे नाटक बसवताना आव्हाने असतातच. कलाकाराने किती पावले पुढे जायचे आहे, किती पावले मागे यायचे आहे किंवा बाजूला सरकायचे आहे तसेच सेट कसा आहे याबद्दलची माहिती कलाकारांना द्यावी लागते. त्यांना सेटवर प्रत्यक्ष बसवून आम्हाला ते सर्व शिकवावे लागते. जे दृष्टिहीन कलाकार असतात, त्यांना आम्हाला सर्वकाही काठीच्या जोरावर शिकवावे लागते किंवा काही ठिकाणी आम्ही धाग्यांचा वापर करतो. त्याप्रमाणे कलाकारांना सेटचा अंदाज येतो. त्यामुळे मला असे वाटते की, ही एक शिकवण्याची प्रोसेस आहे, तसेच ती अॅक्सेसिबिलिटीची सुद्धा प्रोसेस आहे आणि हे आम्ही सगळेजण मिळून करत असतो. त्यातूनच हे सर्वकाही घडत जाते.