आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य
माणूस हा विचार करणारा, जाणिवा असलेला जीव आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे, निर्णयामागे आणि नात्यामागे एक अंतर्गत संघर्ष असतो. तो म्हणजे “मनातील कलह”. हा कलह कधी बाहेर व्यक्त होतो, तर कधी आत खोल खोल दडून राहतो. मनात एकाच वेळी अनेक भावना एकमेकांवर आदळत असतात-आशा आणि निराशा, आत्मविश्वास आणि भीती, प्रेम आणि द्वेष, सहनशीलता आणि असहिष्णुता या द्वंद्वातूनच माणसाचं खऱ्या अर्थाने जीवन घडतं.
मनातील कलह म्हणजे नेमकं काय?
मनातील कलह म्हणजे स्वतःच्याच विचारांशी होणारी झुंज. आपण जे करतो किंवा करायला हवं होतं असं वाटतं, त्यामध्ये विसंगती निर्माण होते. कधी मन “हो” म्हणतं, तर दुसऱ्याच क्षणी “नको” असं वाटतं. हे विचारांमधील किंवा भावनांमधील घालमेल कलह घडवते.
उदा. एखाद्या चुकीवर राग येतो, पण ती चूक प्रिय व्यक्तीनं केलेली असेल तर मन समजावून घेतं. पण आत कुठेतरी रागाचा ठसका राहतो. ही अंतर्गत उलघाल म्हणजेच कलह.
कलह निर्माण होण्याची कारणे :
स्वतः बद्दलची शंका : आत्मविश्वास कमी असेल, स्वतःचे निर्णय योग्य आहेत की नाही, याबाबत शंका असेल, तर मन सतत द्विधा अवस्थेत राहतं.
परिस्थिती आणि मनाप्रमाणे न होणे : जे घडतंय ते आपल्याला हवं तसं नसेल, तर मन स्वीकार करत नाही आणि संघर्ष सुरू होतो. इतरांची अपेक्षा आणि स्वतःची इच्छा एखादं काम समाज किंवा कुटुंबासाठी करायचं असतं पण स्वतःच्या मनापासून नसेल, तेव्हा कलह निर्माण होतो.
भावनिक गुंतवणूक : मनातल्या नात्यांमधील गुंतागुंत, एखाद्याचं वागणं, विसंवाद यामुळे अंतःकरण ढवळून निघतं.
मनातील कलहाचे परिणाम : मानसिक अस्वस्थता : सतत विचारचक्र चालू राहिल्याने मन शांत राहत नाही. झोप न लागणे, चिडचिड, नैराश्य यासारखी लक्षणं दिसू लागतात.
निर्णयक्षमतेवर परिणाम : योग्य तो निर्णय घ्यायची ताकद कमी होते. संधी हुकतात. संकोच वाढतो.
नात्यांतील तणाव : अंतर्गत अस्वस्थतेचा परिणाम व्यक्त होतो तेव्हा आपल्याला जवळच्या लोकांवर राग येतो, ताण वाढतो.
शारीरिक त्रास : दीर्घ काळ असा कलह चालू राहिल्यास शरीरावरही परिणाम होतो. डोकेदुखी, थकवा, ब्लड प्रेशर इ.
कलहातून बाहेर पडण्याचे उपाय
स्वतःशी प्रामाणिक संवाद : मनातील भावना, विचार स्वतःपाशी प्रामाणिकपणे मान्य करणं आवश्यक आहे. स्वतःला दोष देण्यापेक्षा समजून घ्या.
लेखन किंवा अभिव्यक्ती : मनातलं लिहून काढल्याने किंवा एखाद्या विश्वासू व्यक्तीस सांगितल्याने मन हलकं होतं.
ध्यान व श्वासावर नियंत्रण : रोज काही वेळ ध्यान केल्याने मन स्थिर राहतं. हे कलह शमवण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे.
योग्य सल्ला घेणे : गंभीर कलह असेल, तर मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कधीकधी दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहिलं की मार्ग सापडतो.=
स्वतःला वेळ द्या : प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लगेच मिळेलच असं नाही. काही वेळ शांत राहून, विचार करून निर्णय घ्या.
कलहाचे सकारात्मक पैलू : मनातील कलह फक्त नकारात्मक नसतो. तो माणसाला विचार करायला भाग पाडतो. स्वतःमध्ये सुधारणा, निर्णयक्षमतेत वाढ, भावनांची खोली-हे सर्व या अंतर्गत संघर्षातून घडतं. कलह नसेल तर माणूस स्थिर राहील. “मनातील कलह” ही मानवी जीवनाची अपरिहार्य आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. तो टाळण्यापेक्षा समजून घेणं, सामोरे जाणं आणि त्यातून शिकणं अधिक आवश्यक आहे. माणूस म्हणून आपण सर्वजण कधीतरी अशा अवस्थेत असतो. तेव्हा एकमेकांवर प्रेम ठेवणं, समजूतदारपणा दाखवणं आणि संवाद साधणं हेच या कलहावरचे खरे उपाय आहेत.
शांत मन, स्पष्ट विचार आणि संयम हेच मनातील कलहावरचं सर्वोत्तम औषध आहे.