ज्ञानी व्हा, धन्य व्हा!

जीवन संगीत : सद्गुरू वामनराव पै


आज आपण ज्या विषयाला सुरुवात करत आहोत तो म्हणजे अंधारातून प्रकाशाकडे. हा विषय सर्व दृष्टीने महत्त्वाचा आहे. कसा? प्रत्यक्षात “अंधारातून प्रकाशाकडे” म्हणजे काय ? अंधार म्हणजे अज्ञान व प्रकाश म्हणजे ज्ञान. अंधार म्हणजे दुःख, प्रकाश म्हणजे आनंद. अंधार म्हणजे अनिष्ट, प्रकाश म्हणजे इष्ट. अंधार म्हणजे रोग, प्रकाश म्हणजे आरोग्य. अशा प्रकारे आपण पाहिले तर अंधार व प्रकाश, आपल्या जीवनात कसा असतो व कसा असला पाहिजे हे ध्यानात येईल. आज बारकाईने पाहिले तर सगळीकडे अंधार पसरलेला आहे. प्रकाश ज्याला आपण स्वयंप्रकाश म्हणतो तो असून नसल्यासारखा झालेला आहे. एखाद्या दिव्यावर काजळी आलेली असेल, तर त्या दिव्याचा प्रकाश पडत नाही. ती काजळी दूर केली तरच तो प्रकाश सर्वदूर पोहोचेल. तसे आपण जरी स्वयंप्रकाशी असलो तरी, आपण स्वयंप्रकाशित कसे आहोत हे आपल्याला माहीत नाही. मुळात आपण स्वयंप्रकाशित आहोत हेच कोणाला माहीत नाही. त्या स्वयंप्रकाशावर अज्ञानाची काजळी आल्यामुळे त्याचा प्रकाश पडत नाहीच उलट काळोखच पसरला आहे. हे बदलण्यासाठी अंधार म्हणजे अज्ञान हे कायम लक्षात ठेवले पाहिजे. म्हणूनच जीवनविद्या सांगते, “तुम्ही ज्ञानी व्हा, हुशार व्हा, बुद्धिमान व्हा सारे”


सांगायचा मुद्दा हा की, आपले राष्ट्र प्रगतिपथावर जायला पाहिजे असेल, तर आपल्या राष्ट्रातील लोकांनी ज्ञानी झाले पाहिजे, हुशार झाले पाहिजे, बुद्धिमान झाले पाहिजे. पण वस्तुस्तिथी अशी आहे की सर्वत्र अंधार आहे. एक काळ असा होता की, भारत देशात सर्व काही होते. ऐश्वर्य, ईश्वर, धनधान्य सर्व काही या देशांत मुबलक होते. इतकेच नव्हे तर सुवर्णाचा धूर निघत होता. पण आज आपल्या हातात काही नाही. आपल्याला स्वराज्य मिळाले पण सुराज्य मिळाले नाही. आपल्याला काय मिळाले तर परकीयांपासून स्वातंत्र्य मिळाले. ब्रिटिशांपासून सर्वांना, सर्व देशाला स्वातंत्र्य मिळाले. पण पुन्हा देश आपल्याच काही लोकांच्या ताब्यात गेला. अगदी आजही परिस्थिती काही अंशी तशीच आहे. याचे कारण आपल्या राष्ट्रात अंधश्रद्धा, अज्ञान, भोळसटपणा प्रचंड प्रमाणात आहे. भाविक असणे व बावळट असणे यात फरक आहे. मात्र आज असे झालेले आहे की, बावळट माणसालाच भाविक म्हटले जाते. प्रत्यक्षात ज्याच्याकडे भाविकता असते तो भाविक. या दोन्ही गोष्टी अत्यंत भिन्न आहेत. पण अज्ञानातून झालेल्या गैरसमजापायी बरेचदा या दोन्हींना एकच मानले जाते. किंबहुना आज जगात जे काही वाईट आहे त्या सर्वाचे मूळ म्हणजे अज्ञानच. हे अज्ञान दूर होईपर्यंत आपले राष्ट्र सर्वार्थाने सर्वांगाने प्रगती करून पुढे जाईल अशी केवळ आशा करणे चुकीचे आहे. यावर मात करण्यासाठी सर्व समाजाने, समाजातील प्रत्येकाने ज्ञान मिळविणे, शिक्षण घेणे हा त्यावरचा उपाय. कारण जीवनविद्येच्या मते ज्ञान हे शस्त्र, अस्त्र व शास्त्र आहे, ज्ञान हे शक्ती, बळ व सामर्थ्य आहे, ज्ञान हे धन, संपत्ती व ऐश्वर्य आहे, ज्ञान हा देव, परमेश्वर व ईश्वर आहे, म्हणून ज्ञानी व्हा, धन्य व्हा.

Comments
Add Comment

मनातील कलह

आत्मज्ञान : प्राची परचुरे वैद्य माणूस हा विचार करणारा, जाणिवा असलेला जीव आहे. त्याच्या प्रत्येक कृतीमागे,

कपिल महामुनी

भारतीय ऋषी : डॉ. अनुराधा कुलकर्णी सांख्य तत्त्वज्ञानाचे आद्यप्रवर्तक कपिलमहामुनी होत. त्यांनी सांख्यदर्शनाचे

माँ नर्मदा...

!! नमामि देवी नर्मदे!! नर्मदा परिक्रमा म्हणजे एक अध्यात्मिक अनुभूती आहे. ही परिक्रमा म्हणजे नर्मदा मैय्याभोवती

दत्तोपासनेचे सार

ऋतुराज : ऋतुजा केळकर संध्याकाळच्या समयी मंद समईच्या उजेडात मी गुरुदेवांच्या छायेत बसून नकळत हरवून जाते. त्या

Dattatreya Jayanti 2025 : त्रिमूर्ती स्वरूप, २४ गुरूंचे ज्ञान! आदिगुरु दत्तात्रेय कोण? मार्गशीर्ष पौर्णिमेचं धार्मिक महत्त्व काय?

सनातन धर्मामध्ये दत्त जयंतीला अत्यंत विशेष आणि अनन्यसाधारण महत्त्व आहे. भगवान दत्तात्रेयांचा जन्म मार्गशीर्ष

मृगजळाच्या लाटांत दीपस्तंभाची स्थिरता

ऋतुराज : ऋतुजा केळकर आज का कोणजाणे, पण माझं मन अतिशय अस्थिर होतं आणि अचानक शब्द उमटले, कल्पनाः मृगतृष्णेव, नित्यं