रायपूर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रायपूरमध्ये सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून दक्षिण आफ्रिकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने ५० षटकांत पाच बाद ३५८ धावा केल्या. भारताने दक्षिण आफ्रिकेला ५० षटकांत ३५९ धावा करण्याचे आव्हान दिले आहे.
भारताकडून स्टार फलंदाज विराटक कोहलीने सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक केले. कोहली व्यतिरिक्त ऋतुराज गायकवाडनेही शतक झळकावले. भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुल याने नाबाद ६६ धावा करुन अंतिम टप्प्यात संघाच्या धावा वेगाने वाढतील यावर भर दिला. टीम इंडियाकडून यशस्वी जयस्वालने २२, रोहित शर्माने १४, विराट कोहलीने १०२, ऋतुराज गायकवाडने १०५, केएल राहुलने नाबाद ६६, वॉशिंग्टन सुंदरने एक, रविंद्र जडेजाने नाबाद २४ धावांचे योगदान दिले. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने दोन तर नांद्रे बर्गर आणि लुंगी न्गिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. वॉशिंग्टन सुंदर धावचीत झाला.
ऋतुराज आणि कोहली यांनी तिसऱ्या विकेटसाठी १९५ धावांची भागीदारी केली. दोघांचे रनिंग बिटवीन द विकेट कौतुकास्पद होते. अधिकाधिक धावा मिळवण्यासाठी त्यांनी अफाट कष्ट केले. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांवर दबाव आला आणि भारताची धावसंख्या झपाट्याने वाढली. अखेरच्या टप्प्यात केएल राहुल आणि रविंद्र जडेजाने वेगाने धावा वाढवल्या. पण ३७५ किंवा त्यापेक्षा जास्त धावा करण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय संघाला ५० वे षटक संपेपर्यंत ३५९ धावा एवढीच मजल मारणे शक्य झाले. आता कमी पडलेल्या धावांचा त्रास होऊ नये यासाठी भारतीय गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक यांच्याकडून प्रभावी कामगिरी होणे आवश्यक आहे.