मुंबई : महात्मा जोतिराव फुले यांच्या जीवनावर तयार होणाऱ्या सरकारी डॉक्युमेंटरीशी संबंधित महत्त्वाची फाईल गायब झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला असून, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत.
माहिती आणि जनसंपर्क विभागाचे वरिष्ठ सहाय्यक संचालक सागर नामदेव कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ ऑक्टोबर रोजी तपासणीदरम्यान मूळ फाईलच्या जागी केवळ फोटोकॉपी आढळली. विशेष बाब म्हणजे, २०१७ ते २०२० या कालावधीतील संपूर्ण सरकारी नोंदी या फाईलमधून गायब झाल्या आहेत. याविषयी मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, संबंधित फाईल ई-ऑफिसवर उपलब्ध असल्याने ती पुन्हा जनरेट करता येईल. मात्र, मूळ फाईल गहाळ होणे अत्यंत गंभीर असून, यासाठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
............................
नुकसान भरपाईबाबत केंद्राला दोनवेळा पत्रे पाठवली
- अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविलेला नाही, अशी माहिती कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मंगळवारी लोकसभेत दिली. याविषयी स्पष्टीकरण देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे वेळेत प्रस्ताव पाठविला, त्यानंतरच केंद्राचे पाहणी पथक येऊन पाहणी करून गेले.
- राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, त्यांच्या पायाभूत सुविधांची उभारणी व्हावी यासाठी सरकार कटीबद्ध आहे. म्हणूनच, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाठपुरावा करणारी दोन पत्रे केंद्राकडे पाठविली. दोन्ही प्रस्तावांच्या माध्यमातून लवकरच शेतकऱ्यांना मदत मिळेल. दरम्यान, महाराष्ट्र सरकारकडून केंद्राला वेळेत प्रस्ताव आला आहे, असे स्पष्टीकरण केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी बुधवारी दिले.