महाड : महाड तालुक्यातील नाते येथे ७५ वर्षीय लीलावती राजाराम बलकवडे यांची शेतातील वाड्यावर हत्या करून सोन्याचे दागिने व मोबाईल लंपास केल्याच्या प्रकरणाने महाड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र उत्कृष्ट कामगिरी करीत पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत या गुन्ह्याचा छडा लावीत आरोपीला अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार २८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी लीलावती बलकवडे आपल्या शेतातील वाड्यावर गेल्या असता अज्ञात व्यक्तीने गळा दाबून हत्या करून त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल घेत पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, उपविभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रमेश तडवी आणि पथका स्थानिक पातळीवरील माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेतला आणि अभिजीत महेश अंबावले (वय २४, रा. नाते, महाड) या आरोपीस २४ तासांच्या आत ताब्यात घेत या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), १०९ (४), ३११ नुसार गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास सुरू आहे.