कावळा निघाला शाळेला...

कथा : रमेश तांबे


एक होता कावळा. त्याला एकदा वाटलं आपणही शाळेत जावं. माणसांची मुलं शाळेत जातात. तिथं जाऊन मुलं काय करतात हे नीट बघावं. मग कावळा गेला शाळेत. त्याने खिडकीतूनच बघितलं. प्रत्येकाच्या अंगावर गणवेश होता. वह्या, पुस्तकांनी भरलेलं दप्तर होतं. प्रत्येकाकडे पाण्याची बाटली अन् खाऊचा डबासुद्धा होता. मग मुलांनी प्रार्थना म्हटली. छान छान गाणी गायली. जोरदार घोषणा दिल्या. गाणी खूपच छान होती. ती ऐकून कावळ्याला खूप आनंद झाला. अशा शाळेत आपणही जावे. अभ्यास करावा, गाणी गावी, खेळ खेळावा असे त्याला मनोमन वाटू लागले. आपण शाळेत जायचंच असा ठाम निश्चय कावळ्याने केला. तेवढ्यात तिथं एक चित्रांचं पुस्तक त्याला दिसलं. तो चटकन त्या पुस्तकाजवळ गेला. पुस्तक रंगीत आणि गुळगुळीत होतं. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर मोराचं सुंदर चित्र होतं. त्याने पटकन ते पुस्तक उघडलं अन् तो आतली चित्रं पाहू लागला.


त्यात अनेक पक्ष्यांची चित्रं होती. मोर, पोपट, गरुड, मैना, कोकीळ, कबुतर असे किती तरी पक्षी. रंगीत आणि सुंदर सुंदर चित्रे बघून कावळा खूश झाला. पण त्यात कावळ्याचं म्हणजे स्वतःचं चित्र त्याला काही दिसेना. आता तो गोंधळला. त्याने पुस्तक परत परत चाळले. पण तो अगदी निराश झाला. कारण त्यात त्या विचित्र गिधाडांचंसुद्धा चित्र होतं पण कावळ्याचं नाही! त्याने शोधशोध शोधले. पुस्तक उलटेपालटे केले. पण त्यात कुठेही कावळ्याचं चित्र त्याला दिसेना.


आता मात्र कावळा हिरमुसला. त्याला थोडासा रागही आला. मग तो थेट गेला शिक्षकांकडे अन् म्हणाला, “सर सर, मुलांच्या पुस्तकात माझं चित्र का नाही? मी काळा आहे म्हणून का? मग त्यात ती काळी मैना आणि काळा कोकीळ का? सांगा ना सर सांगा! माझा आवाज चांगला नाही म्हणून का माझं चित्र पुस्तकात नाही. मग त्या गुटर्रगू करणाऱ्या कबुतरांना चित्र का?” असे कितीतरी प्रश्न विचारून कावळ्याने त्या शाळेतील शिक्षकांना पुरते भंडावून सोडले. मग कावळाच म्हणाला, “आता मला कळले, की मी असा घाणेरडा राहतो, लोकांचे उष्टे अन्न खातो. म्हणूनच तुम्ही माझं चित्र पुस्तकात छापलं नाही ना.” अन् असं म्हणून कावळा रडू लागला.


कावळ्याच्या रडण्याचा आवाज आता सगळ्या शाळेत पसरला. तसे मुख्याध्यापक धावतच शिक्षकांच्या खोलीत आले. कावळा चक्क रडतोय हे पाहून सरांना आपले हसू आवरेना. तरी आपले हसणे कसेबसे आवरत सरांनी त्याचे म्हणणे नीट ऐकून घेतले. मग सर म्हणाले, “हे बघ कावळ्या, तू असं काही वेडेवाकडे मनात आणू नकोस. तुझा रंग कोणता? तुझा आवाज कसा? हे विसरून जा. त्यावरून कुठल्याही पक्ष्यांची निवड केली जात नाही. निवड करताना एकच गोष्ट ध्यानात घेतली आहे ती म्हणजे त्या पक्ष्यांची मुलांना ओळख व्हावी. अहो कावळे बुवा असे निराश होऊ नका. जे पक्षी मुलांना रोजच्या रोज दिसू शकत नाहीत, अशाच पक्ष्यांची चित्रे आम्ही या पुस्तकात घेतली आहेत. सकाळ-संध्याकाळ तुझं दर्शन सगळ्यांना होतच ना मग कशाला तुझं चित्र हवंय यात! याशिवाय तुझ्या चतुरपणाच्या गोष्टी तर किती प्रसिद्ध आहेत. किती तरी मुलांना त्या सांगता येतात, त्यातून त्यांना केवढा आनंद मिळतो. त्यामुळे तूसुद्धा आमच्यासाठी तितकाच महत्त्वाचा आहे, जेवढे इतर पक्षी.” सरांचं बोलणं ऐकून कावळा खूप खूश झाला. त्याचा चेहरा आनंदी आणि समाधानी दिसू लागला. मग शाळेत जायचं सोडून कावळा गेला रानात उडून.

Comments
Add Comment

कोणासाठी...?

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ आज दुपारी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आणि माझी मैत्रीण रजनी मुलुंडला

माणूस बदलू शकतो

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर माणूस हा विचार, भावना आणि कृती असलेला संवेदनशील प्राणी आहे. परिस्थिती,

स्ट्रॉ ने पेय कशी पितात?

कथा : प्रा. देवबा पाटील त्या दिवशीही सीता व निता या दोघी बहिणींनी शाळेतून घरी येताबरोबर आपला अभ्यास करून घेतला. नि

बाळाचा हट्ट!

कथा : रमेश तांबे एक होती मांजर आणि तिला होतं एक बाळ! पांढऱ्याशुभ्र रंगाचं, घाऱ्या घाऱ्या डोळ्यांचं! ते खूप खेळायचं,

प्रयत्नवादाला स्वीकारा

लहानशा गोष्टी, मोठा अर्थ : शिल्पा अष्टमकर केल्याने होत आहे रे।  आधी केलेची पाहिजे।

विष

प्रतिभारंग : प्रा. प्रतिभा सराफ ‘विष’ हा विषय? बापरे! आजच्या विषयाचे नाव बघून थोडसे घाबरायलाच होतंय ना? पण कोणते