मागाठाणेत उबाठाला शिवसेनेचेच आव्हान

चित्र पालिकेचे : मागाठाणे विधानसभा


सचिन धानजी मुंबई : मागाठाणे विधानसभेत शिवसेनेचे प्रकाश सुर्वे हे आमदार असून त्यांच्या पक्षाचे चार नगरसेवक असल्याने या प्रभागात शिवसेनेची चांगल्याप्रकारे ताकद दिसून येत आहे. परंतु या मागाठाणेमध्ये मनसेच्यावतीनेही जागांची मागणी केली जात असून सातपैंकी मनसेकडून प्रभाग क्रमांक ५, प्रभाग क्रमांक ११ आणि प्रभाग क्रमांक १२ वर दावा केला जावू शकतो. या तिन्ही प्रभागात शिवसेनेचे नगरसेवक असल्याने मनसेकडून मागणी झाल्यास किमान दोन प्रभाग उबाठाकडून सोडले जाण्याची शक्यता आहे. मात्र, या विधानसभेत भाजपाचे एकाचे दोन तर शिवसेना चाराचे पाच करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे.


मागाठाणे विधानसभा मतदार संघात सात महापालिका प्रभाग येत असून त्यातील तीन सर्वसाधारण खुला, दोन ओबीसी महिला, एक ओबीसी तसेच एक एस सी प्रभाग करता राखीव झाला आहे. या मागाठाणेमध्ये यापूर्वी दोन ओबीसी, दोन सर्वसाधारण खुला, दोन महिला आणि एक एसी महिला याकरिता राखीव होता.


त्यामुळे महिला प्रभाग न झाल्याने महिलांची मोठी पंचाईत झाली आहे. त्या तुलनेत आणखी एक प्रभाग खुला झाला आहे. या विधानसभेत शिवसेनेचे चार तर उबाठाचे दोन तसेच भाजपाचा एक
नगरसेवक आहे.


त्यामुळे मागाठाणेत शिवसेना भाजपा युतीचे प्रस्थ दिसून येत असून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवाराला या विधानसभेत एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत, तर विरोधी पक्षाच्या उमेदवाराला त्याच्या निम्म्यापेक्षा कमी मतदान झालेले आहे.


लोकसभा निवडणुकीतील मागाठाणेतील निकाल




  1. भाजपा पीयूष गोयल : १ लाख १ हजार ३२१

  2. काँग्रेस भूषण पाटील : ५५ हजार ४१३


मागाठाणे विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल




  1. शिवसेना प्रकाश सुर्वे : १ लाख ०५ हजार ५२७

  2. उबाठा उदेश पाटेकर : ४७ हजार ३६३

  3. मनसे नयन कदम : २१ हजार २९७


 प्रभाग ३ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)
हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण प्रवर्गाकरता राखीव होता आणि पुन्हा एकदा हा प्रभाग खुला झाल्याने विद्यमान नगरसेवक असलेले बाळकृष्ण ब्रीद हे शिवसेनेकडून पुन्हा निवडणूक रिंगणात उतरु शकतात. ब्रीद हे सध्या शिवसेनेत असल्याने उबाठा शिवसेनेकडून इच्छुकांची मोठी यादी तयार झाली आहे. या प्रभागातून उबाठाच्यावतीने रोशनी गायकवाड, उपाध्याय आणि दादा पानमंद यांच्या नावाची चर्चा आहे. या प्रभागातून काँग्रेसकडून चोथीप्रसाद गुप्ता आणि माजी नगरसेवक चौबे यांचे पुत्र अभय चौबे यांच्यात उमेदवारीसाठी चुरस आहे. त्यामुळे या प्रभागात शिवसेना विरुद्ध उबाठा यांच्यासह काँग्रेस अशी तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे.


 प्रभाग ४ (ओबीसी प्रवर्ग)
हा प्रभाग पूर्वी महिला राखीव असला तरी आता ओबीसी राखीव झाल्याने विद्यमान नगरसेविका सुजाता पाटेकर यांची मोठी अडचण झाली आहे. ओबीसी प्रमाणपत्र नसल्याने पाटेकर यांना आता दुसऱ्या प्रभागात जावे लागणार आहे. हा प्रभाग पाटेकर दाम्पत्यांनी चांगल्याप्रकारे बांधल्याने यावर त्यांची पकड चांगली होती; परंतु आरक्षणामुळे त्यांना या प्रभागातून लढता येणार नाही. त्यामुळे या प्रभागातून उबाठाकडून राजू मुल्ला आणि अमोल म्हात्रे यांची नावे चर्चेत आहेत, तर शिवसेनेकडून मंगेश पंगारे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. पाटेकर या विभागातून निवडणूक लढवणार नसल्याने पंगारे यांना या प्रभागात खेळण्यास मैदान मोकळे मिळणार आहे. काँग्रेसच्या इच्छुक उमेदवाराची चर्चाच नसून या प्रभागात शिवसेना विरुद्ध उबाठा अशीच लढत पाहायला मिळणार आहे.


 प्रभाग ५ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)
हा प्रभाग यापूर्वी ओबीसी होता, परंतु आगामी निवडणुकीत हा प्रभाग खुला झाला आहे. त्यामुळे विद्यमान नगरसेवक संजय घाडी यांना पुन्हा याच प्रभागात लढण्याचा मार्ग खुला झाला आहे. प्रभाग खुला झाल्याने शिवसेनेकडून संजय घाडी यांना पुन्हा संधी मिळणार आहे. उबाठाकडून उदेश पाटेकर किंवा सुजाता पाटेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर या प्रभागातून मनसेच्यावतीने बंटी घाग आणि हर्षद सावंत यांचीही नावे इच्छुकांच्या स्पर्धेत आहेत.


 प्रभाग ११ (ओबीसी महिला प्रवर्ग)
हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण खुला होता, परंतु आता हा प्रभाग ओबीसी महिला राखीव झाला आहे. त्यामुळे खुल्या प्रवर्गातून निवडून आलेल्या रिद्धी खुरसुंगे या स्वत: ओबीसी असल्याने त्यांना पुन्हा या प्रभागातून लढण्याची संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे शिवसेनेकडून पुन्हा एकदा रिद्धी भास्कर खुरसुंगे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. या प्रभागात खुरसुंगे यांचे प्रस्थ असल्याने उबाठाकडून कुणाली उमेदवारी मिळणार की उमेदवार नसल्याने मनसेला सोडणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. उबाठाकडून उपशाखाप्रमुख कुर्ले यांच्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवतात की मनसेचे राजू माने यावर दावा करता याकडे सर्वांचे लक्ष आहे. खुरसुंगे यांच्यासमोर टिकाव लागणार नसल्याने उबाठा हा प्रभाग मनसेला सोडेल अशीही चर्चा आहे. तसेच झाल्यास मनसेकडून राजू माने हे आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवू शकतात असे बोलले
जात आहे.


प्रभाग १२ (ओबीसी महिला प्रवर्ग)
हा प्रभाग यापूर्वी सर्वसाधारण खुला होता, पण आता प्रभाग आता ओबीसी महिला राखीव झाला आहे. या प्रभाग खुला असला तरी २०१७ मध्ये शिवसेनेच्यावतीने गीता सिंघण या निवडून आल्या होत्या, पण आता हा प्रभाग ओबीसी महिला झाल्याने गीता सिंघण किंवा त्यांची मुलगी निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. उबाठाकडून या प्रभागातून माजी नगरसेविका शिल्पा चोगले या आपल्या मुलीला निवडणूक रिंगणात उतरवण्यासाठी इच्छुक आहेत. या प्रभागातून यापूर्वी मनसेचे नगरसेवक म्हणून शिल्पा चोगले या निवडून आल्या असल्या तरी आता उबाठाकडे आहेत. मात्र, या प्रभागावर मनसेचा प्रबळ दावा असेल. त्यामुळे उबाठात गेलेल्या शिल्पा चोगले यांची मोठी अडचण होण्याची शक्यता आहे. मनसेकडून इच्छुकाचे नाव पुढे येत नसले तरी मनसेला ओबीसी महिला उमेदवार शोधावा लागेल किंवा उमेदवार नसल्याने उबाठाला सोडावा लागणार आहे.


 प्रभाग २५ (सर्वसाधारण खुला प्रवर्ग)
हा प्रभाग महिला आरक्षित होता, त्यामुळे योगेश भोईर यांनी आपल्या पत्नीला निवडणूक रिंगणात उभे करून निवडून आणले होते; परंतु हा प्रभाग आता खुला झाल्याने विद्यमान नगरसेविका माधुरी भोईर यांना पुन्हा संधी प्राप्त झाली आहे. त्यामुळे उबाठाकडून माधुरी भोईर यांना पुन्हा निवडणूक रिंगणात उभे केले जाणार की स्वत: प्रभाग खुला झाल्याने योगेश भोईर रिंगणात उतरणार असा प्रश्न पडला आहे. या प्रभागावर भाजपाचा दावा असून भाजपाच्यावतीने यापूर्वी निवडणूक लढलेल्या निशा परुळेकर यांच्यासह देवांग दवे यांच्या नावाची चर्चा आहे. हा प्रभाग उबाठाच्या वाट्याला जाणार असल्याने मनसेचा दावा नसेल; परंतु हा प्रभाग पूर्वी काँग्रेसचा असला तरी काँग्रेसच्या उमेदवाराच्या नावाचीही चर्चा ऐकायला मिळत नाही.


प्रभाग क्रमांक २६ (एसी प्रवर्ग)
हा प्रभाग महिला एससी महिला राखीव होता, पण आता हा प्रभाग पुन्हा एसी झाला आहे. त्यामुळे या प्रभागातून निवडून आलेल्या भाजपच्या प्रितम पंडागळे यांची उमेदवारी कायम राखली जाणार आहे. एससी खुला झाल्याने भाजपाकडून प्रितम पंडागळे यांना उमेदवारी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रितम पंडागळे या पुन्हा निवडणूक रिंगणात उभ्या राहतात की त्यांचे पुत्र मयुर पंडागळे यांना उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात याकडे सर्वांचे लक्ष असेल. मयुर पंडागळे हे प्रभाग क्रमांक २६चे वॉर्ड अध्यक्ष असल्याने प्रितम पंडागळे किंवा मयुर पंडागळे यांच्या नावाची चर्चा आहे, तर उबाठाकडून भारती पंडागळे हे निवडणूक रिंगणात उतरू शकतात. काँग्रेसकडून रक्षा वाघ यांचे नाव चर्चेत असल्याचे ऐकायला मिळत आहे.

Comments
Add Comment

Morning Routine : सकाळी उठल्यावर कधीही करू नका या ८ सवयी; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सकाळच्या छोट्या सवयी तुमच्या आरोग्यावर मोठा परिणाम करू शकतात. चला जाणून घेऊ दिवसाची सुरुवात कशी करावी.  ( Morning

‘ Samarth Marathi Movie : समर्थ’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी विचारांना आजच्या काळाशी जोडणाऱ्या ‘समर्थ’ या आगामी मराठी चित्रपटाचा

Ramayana Movie : 'रामायण'च्या ट्रेलरला सेन्सॉर बोर्डाची मंजुरी

मुंबई : रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेल्या आणि अत्यंत बहुप्रतिक्षित अशा 'रामायण: पार्ट १' ( Ramayana Movie) या पौराणिक

Solar Eclipse : ऑगस्टमध्ये खग्रास सूर्यग्रहण; भारतातून दिसणार की नाही ? युरोपमधून दिसेल दुर्मिळ खगोलीय दृश्य !

नवी दिल्ली : तब्बल दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा खग्रास सूर्यग्रहणाचे साक्षीदार होण्याची संधी जगाला मिळणार आहे.

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ahilyanagar : अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, आरोपीला अटक; दोन गावे कडकडीत बंद

Ahilyanagar ( राहुरी /आश्वी प्रतिनिधी ) : अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) तालुक्यात तुळापूर (Tulapur) येथील एक संतापजनक घटना