नवी दिल्ली : रशियाचे राष्ट्रपती पुतिन दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते चार आणि पाच डिसेंबर २०२५ रोजी भारतात असतील. या दौऱ्यात पुतिन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. पुतिन यांच्या भारत दौऱ्यात रशिया आणि भारत यांच्यातील सहकार्याबाबत सविस्तर चर्चा होणार आहे.
राष्ट्रपती भवन येथे रशियाचे राष्ट्रपती पुतिन यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यावतीने परंपरागत पद्धतीने स्वागत केले जाईल. पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवन येथे डिनर पार्टीचे आयोजन केले जाणार आहे.
युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते संरक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, ऊर्जा यांसह अनेक विषयांतील रशिया आणि भारत यांच्यातल्या सहकार्याबाबत सविस्तर चर्चा करणार आहेत. अमेरिकेने लादलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशांपुढे निर्माण झालेली आव्हाने आणि त्यावरील तोडगा यावरही चर्चा होणार आहे. रशिया आणि भारत यांच्यात युक्रेन युद्ध या विषयावरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
पुढील काही वर्षांत भारत-रशिया व्यापार १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. थेट रुपया-रुबल व्यवहार अधिक मजबूत केले जातील. खते, कोळसा, अणुऊर्जा आणि शेती या क्षेत्रात नवीन करार केले जातील. त्याच वेळी, डॉलरपासून दूर जाऊन, दोन्ही देश अमेरिकेच्या निर्बधांना समर्थपणे तोंड देण्याचा प्रयत्न करतील.
भारत रशियाकडून आयात करायच्या संरक्षण साहित्य, तेल आदी विषयांवर सविस्तर चर्चा करणार आहे.