मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आले असल्याने बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजनल्यापासून हाती घेण्यात येणार आहे. हे काम गुरुवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. या जलवाहिनी दुरुस्तीच्या काळात अर्ध्या मुंबईत १५ टक्के कपात लागू राहणार आहे.
तानसा धरणातून भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी टाकण्याची काही कामे केली जाणार आहेत. त्यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्यक आहे. या कामकाजामुळे भांडुप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणा-या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्के घट होणार आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शहर विभागातील ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरातील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणा-या पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात केली जाणार आहे. बुधवारी ३ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरूवारी ४ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यात १५ टक्के कपात लागू राहणार आहे. या कालावधीत कृपया पाण्याचा पुरेसा साठा करुन ठेवावा,असे आवाहन महापालिकेने केले आहे.