लेखक- कॅप्टन (डॉ.) ए.वाय. राजेंद्र, सीईओ - अॅनिमल अँड अॅक्वा फीड बिझनेस, गोदरेज अॅग्रोव्हेट लिमिटेड
डॉ. वर्गीस कुरियन यांच्या जयंतीनिमित्त भारतात राष्ट्रीय दूध दिवस साजरा केला जातो. श्वेत क्रांतीचे जनक असलेल्या कुरियन यांनी दिलेल्या या वारशाचे स्मरण करत असतानाच, त्यांची हीच दूरदृष्टी लक्षात घेऊन दुसऱ्या श्वेत क्रांतीसाठी उत्पादकतेवर आधारित परिवर्तन कसे घडवता येईल, याचा देशाच्या दुग्ध क्षेत्राच्या दृष्टीने विचार करण्याचा हाच क्षण आहे. सातत्यपूर्ण संस्थात्मक प्रयत्नांमुळे, दुधाच्या दीर्घकालीन टंचाईतून बाहेर पडून भारत जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक बनला. आजघडीला जागतिक पुरवठ्यात जवळजवळ २५% वाटा भारताचा आहे. स्वातंत्र्याच्या वेळी देशात दरवर्षी २.१ कोटी टन दूध उत्पादन होत होते. ज्याची दररोज दरडोई उपलब्धता केवळ १२४ ग्रॅम होती.
आज, उत्पादन २०० दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे आणि दरडोई उपलब्धता ४७१ ग्रॅमपर्यंत वाढली आहे जी ३२२ ग्रॅमच्या जागतिक सरासरीपेक्षा जास्त आहे. या संरचनात्मक प्रगतीमुळे भारताचा दूध पुरवठा सुरक्षित झाला आहे. आता पुढची पायरी म्हणजे उत्पादकता वाढवणे.
भारतातील ही आकडेवारी एक गंभीर आव्हान लपवते ते म्हणजे प्रति जनावर उत्पादनाचे प्रमाण. ते अजूनही कमी आहे. जगातील दूधदुभत्या गायींची सर्वाधिक संख्या भारतात असूनही जागतिक सरासरीच्या तुलनेत दररोज फक्त ४.८७ किलो दूध देते. जागतिक सरासरी ७.१८ किलो आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी पोषण, जनुके आणि प्राण्यांच्या वैज्ञानिकदृष्ट्या काळजीमध्ये उत्पादकता-केंद्रित 'श्वेत क्रांती २.० 'ची गरज आहे. यासाठी पोषण ही तातडीची गरज आहे. गुरांची संख्या वाढली असली तरी, उत्पादन तेवढ्या वेगाने होत नाही. 'कमीतून जास्त मिळवण्यासाठी' भारताने उत्तम जनुके, व्यवस्थापन आणि पोषण याद्वारे प्रति प्राणी उत्पादकता सुधारली पाहिजे. जवळजवळ ७० दशलक्ष टन पशुखाद्याची देशाची गरज आहे. पण त्या तुलनेत सध्या केवळ ७.५ दशलक्ष टनाचीच निर्मिती होते आहे. यासोबतच हिरव्या तसेच कोरड्या चाऱ्याची कमतरता कायम आहे. चांगल्या प्रतीचे सायलेज हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो. कारण या माध्यमातून गायीच्या ऊर्जेच्या गरजांपैकी निम्म्या गरजा पूर्ण होऊ शकतात. विशेषतः प्रजनन, स्तनपानाच्या टप्प्यानुसार आणि हवामानानुसार पशुखाद्याची ही गरज भरून काढण्यासाठी चारा धोरणे अधिक शास्त्रीय व्हायला हवीत.
जेनेटिक्स हा दुसरा पर्याय आहे. पंजाबसारखी संकरित गुरांवर जास्त भर देणारी राज्ये सातत्याने चांगले उत्पादन मिळवतात. आधुनिक प्रजनन साधनांद्वारे अनुवांशिक सुधारणा जलद केल्याने, यात भ्रूण हस्तांतरण, सेक्स सॉर्टेड सीमेन आणि कृत्रिम गर्भाधान यांचा समावेश आहे. अशा उपायांमुळे कळपाची गुणवत्ता वेगाने सुधारू शकते आणि उत्पादक कालव किंवा मादी वासरांची संख्या वाढवू शकते. यासाठीचा तिसरा आधारस्तंभ म्हणजे गुरांचे उत्तम व्यवस्थापन आणि आरोग्यसेवा. नियमित पशुवैद्यकीय काळजी, वेळेवर लसीकरण आणि लम्पीसारख्या त्वचा रोगांच्या बाबतीत आजारांचे वेळेवर निदान हे अत्यंत गरजेचे आहे.
जनावरांसाठी योग्य आणि आरामदायी निवासस्थान- उन्हाच्या तडाख्यापासून संरक्षण, हिवाळ्यातील काळजी आणि स्वच्छ, हवेशीर शेड - या सर्व गोष्टींचा एकत्रित परिणाम थेट उत्पादकतेवर होतो. डिजिटल साधनांमुळे आरोग्य, पोषण आणि त्यांच्या रोजच्या वर्तनाचे रिअल-टाइम निरीक्षण करणे शक्य होते. यामुळे गुरांची काळजी अधिक परिणामकारकरित्या घेतली जाऊ शकते. ज्यामुळे शेतकऱ्यांना एकूणच जोखमीचा अंदाज घेऊन नुकसान टाळता येते.
राष्ट्रीय दूध दिवस म्हणजे या क्षेत्रात भारताने किती प्रगती केली आहे, याचा निदर्शक आहे. तसेच पुढे काय करायचे आहे, याचा वास्तवदर्शी आरसा आहे. त्यासाठी कृती करण्याचे आवाहन आहे. श्वेत क्रांतीने देशाची दुग्ध व्यवसायाची क्षमता सिद्ध केली. आता उत्पादकतेच्या आव्हानांवर मार्ग शोधल्याने उत्पन्न तर वाढेलच पण दूध आणि मूल्यवर्धित दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत देखील वाढ होऊ शकते. भारताने आज कष्टाने दुग्ध सुरक्षा मिळवली आहे. डॉ. कुरियन यांच्या वारशाचा सन्मान करणे म्हणजे केवळ त्यांच्या कामगिरीचे स्मरण करणे नव्हे तर अधिक कार्यक्षम, लवचिक आणि भविष्यासाठी तयार असे दुग्ध क्षेत्र निर्माण करण्याचे त्यांचे स्वप्न पुढे नेणे होय.