- एमएमआरमधील प्रवासाला येणार वेग
मुंबई : महाराष्ट्र शासनाने उत्तन–विरार सी लिंक आणि तिचा वाढवण बंदरापर्यंत होणारा विस्तार मंजूर केला आहे. त्यामुळे दक्षिण मुंबई ते वसई, विरार, पालघर आणि देशातील होऊ घातलेल्या सर्वात मोठ्या खोल समुद्रातील बंदरापर्यंत १२० किमीचा पूर्णपणे प्रवेश-नियंत्रित, उच्च- गतीचा सागरी महामार्ग उभा राहणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) आता मोठ्या प्रवास क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. असा हाय-स्पीड किनारी मार्ग, जो प्रवास वेगवान करेल, सुरक्षितता वाढवेल आणि संपूर्ण प्रदेशाच्या विकासाला नवी चालना देईल.
या कॉरिडॉरमुळे उत्तन–भाईंदर, वसई आणि विरार पट्ट्यातील विकासाला नवे दरवाजे उघडतील आणि स्थानिक नागरिकांसाठी मोठ्या संधी निर्माण होतील. सदर प्रस्ताव आता केंद्र सरकारकडे शिफारशीसाठी पाठवण्यात आला असून, या प्रकल्पाच्या माध्यमातून एमएमआरच्या सागरी विकास व कनेक्टिव्हिटीच्या नवा अध्यायाची सुरुवात झाली आहे.
मुंबई–वाढवण एक्स्प्रेसवे कॉरिडॉर (एमव्हीईसी) मुंबईला तिच्या उत्तर आणि दूरच्या उपनगरांच्या अधिक जवळ आणेल तसेच लोक, उद्योग व मालवाहतूक यांना जोडणारे एक अखंड, जलद आणि आधुनिक नेटवर्क तयार करेल. या प्रकल्पाचा केंद्रबिंदू २४.३५ किमी लांबीचा उत्तन–विरार सी लिंक असून तो देशातील सर्वात लांब सेतू ठरणार आहे. ३० किमीहून अधिक कनेक्टर्स, ६ लेन्स, आपत्कालीन लेन, नेव्हिगेशन स्पॅन आणि अत्याधुनिक इंटेलिजेंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम (आयटीएस) सह हा प्रकल्प वेग, सुरक्षितता आणि गतिशीलता लक्षात घेऊन उभारला जाणार आहे.
मुंबई-वाढवण एक्स्प्रेसवे कॉरिडॉर पूर्ण झाल्यावर
- पश्चिम द्रुतगती महामार्ग, एसव्ही रोड आणि लिंक रोडवरील गर्दी मोठ्या प्रमाणावर कमी होईल.
- प्रवासाचा वेळ लक्षणीय घटेल.
- प्रदूषणात घट होईल.
- पर्यटन, घरकुल आणि पोर्ट-आधारित विकासाला नवी गती मिळेल.
- हजारो नवीन रोजगार निर्माण होतील.