सायन प्रतिक्षानगर म्हाडा संक्रमण शिबिरातील टी-३६, टी-३७, टी-५३ आणि टी-५४ या इमारती धोकादायक असून 'गाळे तात्काळ रिकामी' करण्याचा फ्लेक्सद्वारे जाहीर केल्यानंतर रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या फ्लेक्स मध्ये आयआयटीद्वारे या इमारतींचा स्ट्रक्चरल ऑडिटचा करण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला असून या इमारती राहण्यासाठी धोकादायक असल्याचे फ्लेक्समध्ये नमूद करण्यात आले आहे. अचानक आणि कोणतीही पूर्वसूचना न देता अशा प्रकारचे फ्लेक्स लावून म्हाडाने रहिवाश्यांवर "बिल्डिंग रिकामी करा" असा दबाव टाकत असल्याचा आरोप रहिवाशांमार्फत करण्यात येत आहे.
रहिवाशांच्या मते, इमारती धोकादायक असल्याचे सांगत म्हाडाने फ्लेक्सवरून तात्काळ गाळे रिकामे करण्याचे आवाहन केले असले तरी प्रत्यक्षात स्थलांतराची कोणतीही पारदर्शक प्रक्रिया, योग्य बैठक, लेखी हमी किंवा संवाद साधला गेलेला नाही. त्यातच फ्लेक्सवर दिलेले पर्याय; संक्रमण शिबिरातील गाळे किंवा २० हजार रुपये प्रतिमहिना भाडे, हे अपुरे, अव्यवहार्य आणि रहिवाशांच्या संख्येच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याची भावना रहिवाशांनी व्यक्त केली. रहिवाश्यांनी म्हाडाला मागणी केली आहे की, अचानक फ्लेक्स लावून लोकांमध्ये भीती निर्माण करणे थांबवावे. पुनर्विकासाची अधिकृत माहिती, दस्तऐवज, वेळापत्रक व हमीपत्र द्यावे. प्रत्यक्ष सर्वसामान्यांशी चर्चा करून लोकशाही पद्धतीने निर्णय घ्यावा. दरम्यान म्हाडाच्या निर्णयाविरोधात रहिवाश्यांनी एकजुटीने पुढील आंदोलनाची तयारी सुरू केली आहे.
आयआयटीच्या अहवालानुसार आता म्हाडाच्या उपाध्यक्षांनी या चारही इमारतींचा पुनर्विकास मुंबई मंडळाच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कार्यवाही सुरू आहे. दुसरीकडे दुरुस्ती मंडळाने या अतिधोकादायक इमारतीतील २५० ते २७५ रहिवाशांना गाळे रिकामे करण्याच्या नोटीसा बजावल्या आहेत. इतर संक्रमण शिबिरातील गाळे वा महिना २० हजार रुपये घरभाडे असे दोन पर्यायही दुरुस्ती मंडळाने रहिवाशांना दिले आहेत. तेव्हा आता हे गाळे रिकामे करुन पुनर्विकासाचे काम हाती घेण्याचे आव्हान दुरुस्ती मंडळासह मुंबई मंडळासमोर असेल. दरम्यान दुरुस्ती मंडळाकडून देण्यात आलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडून गाळे रिकामे न केल्यास आणि भविष्यात कोणतीही पडझड वा दुर्घटना झाल्यास त्यात जिवितहानी, वित्तहानी झाल्यास दुरुस्ती मंडळ जबाबदार राहणार नाही, असे दुरुस्ती मंडळाने इमारतीबाहेर लावलेल्या आवाहनात नमूद केले आहे