महापालिकेने केले स्पष्ट
मुंबई (खास प्रतिनिधी) : राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार, प्रारुप मतदार यादीची दिनांक १४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रसिद्धी करणे अपेक्षित होते. त्यानुसार, राज्य निवडणूक आयोगाकडून महानगरपालिका प्रशासनास प्रारुप मतदार यादी प्राप्त झाल्या. त्यावर १४ नोव्हेंबर २०२५ असा तारखेचा उल्लेख होता. परंतु, यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारित वेळापत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार, २० नोव्हेंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे आदेश महानगरपालिका प्रशासनास प्राप्त झाले.
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-२०२५ च्या प्रारुप मतदार यादीवरील तारखेच्या अनुषंगाने प्रसार माध्यम आणि समाज माध्यमांवरुन आरोप केले जात आहेत. तथापि, हे आरोप तथ्यहीन आहेत, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. प्रारुप मतदार यादीच्या प्रकाशित प्रतींवर १४ नोव्हेंबर २०२५ हा उल्लेख होता. मात्र, ही यादी माननीय राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २० नोव्हेंबर २०२५ रोजीच प्रसिद्ध करण्यात आली. त्यापूर्वी ही यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध झाली नाही अथवा महानगरपालिकेच्या निवडणूक शाखेतून वितरितही करण्यात आली नाही. त्यामुळे, प्रारुप मतदार यादीवरील तारखेवरुन संभ्रम निर्माण करणे अथवा आरोप करणे तथ्यहीन आहे, असे मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे.