मोहित सोमण:जागतिक बेंचमार्क म्हणून प्रस्थापित झालेला एम एस सी आय (Morgan Stanley Capital International MSCI) निर्देशांकातील मागील आढाव्याच्या अंमलबजावणीची मुदत आज संपली आहे. त्यामुळे आता या निर्देशांकात मोठे बदल होणार आहेत. मागील बैठकीनुसार, फोर्टिस हेल्थकेअर, वन ९७ (Paytm), जीई व्हर्नोवा टी अँड डी इंडिया, सिमेन्स एनर्जी इंडिया हे शेअर भारतीय मानक निर्देशांकात (Indian Standard Index) या श्रेणीत जोडले गेले आहेत तर कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (Concor), टाटा इलकसी (Tata Elxsi) हे शेअर काढण्यात आले आहेत. जुन्या यादीची आज मुदत संपत असल्याने आज सत्र संपल्यानंतर हे नवे बदल पार पडणार आहेत. त्यामुळे या फेरबदलायमुळे बदललेल्या मानकांनुसार भारतीय शेअर बाजारातील हालचाल परिणामकारकरित्या बदलू शकते.
नक्की आणखी काय बदल आहेत?
सात लार्जकॅप व मिडकॅप शेअरमध्ये बदल झालेले आहेत. उदाहरणार्थ या जागतिक निर्देशांकातून भारतीय बाजारातील अपोलो हॉस्पिटल, लुपिन, युपीएल, अलकेम लॅबोरेटरी, ज्यूब्लिंएट फूडस, एसआरएफ, एशियन पेंटस या शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची आवक वाढण्याची शक्यता आहे. कारण या शेअरचे प्रतिनिधित्व अथवा वजन वाढल्याने या कंपन्यांचा निर्देशांकात प्रभाव वाढू शकतो. तर दुसरीकडे निर्देशांकातून संवर्धना मदर्सन, झायडस लाईफसायन्स, कोलगेट पामोलीव, भारत फोर्ज, सुंदरम फायनान्स या सारख्या शेअरचे संबंधित आंतरराष्ट्रीय निर्देशांकातील वजन अथवा प्रभाव घसरणार आहे.
आता MSCI India Index म्हणजे नक्की काय?
MSCI Index हा एक जागतिक दर्जाचा मानक म्हणून ओळखला जातो. शेअर बाजारातील गुणात्मक व संख्यात्मक परिस्थितीचा अंदाज घेऊन कंपन्यांच्या निर्देशांकातील प्रभावाचे मोजमाप या निमित्ताने केले जाते. या निर्देशांकातील बदल सुचवण्यासाठी वर्षातून चार वेळा बैठक संस्थेकडून घेतली जाते. सामान्यतः फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर महिन्यात ही बैठक होते. या बैठकीत परिस्थितीचे पुनरावलोकन (Review) घेऊन यांच्यातील काही शेअर काढून निर्देशांकातील वेटेजसाठी काही नवी शेअरची घोषणा केली जाते.
कंपनीच्या गुणात्मक व संख्यात्मक दर्जा व्यतिरिक्त इतर कंपनीचे निकषही या निर्देशांकात तपासले जातात. कंपनीची आर्थिक परिस्थिती, बाजारातील परिस्थिती, परिणामकारकता, कंपनीचे बाजार भांडवल (Market Capitalisation), कंपनीचा बाजारात फ्री फ्लोट (उपलब्ध असलेले) शेअर, तसेच कंपनीच्या शेअरमधील सहजता, उपलब्धता, तरलता (Liqudity) यांचा सांगोपांग विचार करुन पुढील बदल केले जातात. बाजारातील परिस्थितीवर अभ्यास करून हे महत्वपूर्ण निर्णय संस्था वेळोवेळी घेत असते. सध्या घडत असलेले परिणाम पाहता भविष्यातील कामगिरीही पडताळून संस्था नव्या व जुन्या शेअरचे पुनरावलोकन करते. निकाल लागल्यानंतरही कंपनीच्या शेअर्समध्ये याचा सकारात्मक अथवा नकारात्मक परिणाम संबंधित शेअरवर होत असतो. नव्याने सामील झालेल्या शेअर्सला निर्देशांकात महत्व प्राप्त झाल्याने या शेअर्समध्ये परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची गुंतवणूकही वाढू शकते.
शेअरला जमा सामील अथवा काढण्याचे निकष काय?
कंपनीची कामगिरी, साईज, बाजार भांडवल, रोजची तरलता (Liquidity) किंवा शेअर्समध्ये दररोजचे व्यवहार किती (Average Daily Traded Value) अशा अनेक निकषांचा विचार केला जातो. त्यानंतर कंपनीचे लार्ज मिड स्मॉल कॅप मध्ये वर्गीकरण केले जाते.
मुख्य निर्देशांकाशी संलग्न असलेल्या कंपनीच्या तुलनेत या निर्देशांकात संबंधित कंपन्यांचे वर्गीकरण होते. क्षेत्रीय विशेष निर्देशांक त्यांचे गुणधर्म त्या क्षेत्रातील कंपनीची कामगिरी, महत्व, बाजार भांडवल या आधारे त्या क्षेत्रीय विशेष निर्देशांकातील कंपनीचे वेटेज निश्चित होते.
कंपनीचे बाजार भांडवल किती आहे यावरून या शेअरचे निर्देशांकातील महत्व निश्चित होते.
निवडीनंतर, स्टॉकचे वजन फ्री-फ्लोट-अॅडजस्टेड मार्केट कॅपिटलायझेशन किंवा विशिष्ट निर्देशांक नियमांनुसार निश्चित केले जाते.
निर्देशांकाचे का आहे महत्व?
२०२५ पर्यंत, अंदाजे १८.३ ट्रिलियन डॉलर इतकी व्यवस्थापनाखालील मालमत्ता जागतिक स्तरावर एम एस ए आय निर्देशांकात बेंचमार्क केल्या गेल्या आहेत असे समजले जाते. या निर्देशांकात २ ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त एक्सचेंज-ट्रेडेड फंड (ETF) समाविष्ट आहेत. यामुळेच निर्देशांक जागतिक वित्त क्षेत्रातील सर्वात प्रभावशाली मानकांमध्ये (Standards) समाविष्ट झाले आहेत.
त्यातही भारतासाठी हा निर्देशांक महत्वाचा कारण आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत, भारत 'MSCI Emerging Market' निर्देशांकात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा निर्देशांक म्हणून समाविष्ट केला गेला होता. चीननंतर देशाचा क्रमांक लागतो.