मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक दशकं आपल्या अभिनयाने अमीट ठसा उमटवणारे दिग्गज कलाकार धर्मेंद्र यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. काही दिवसांपासून प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू होते. तब्येत सुधारल्यानंतर त्यांना घरी आणण्यात आले होते, मात्र आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. वयाच्या ८९ व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
धर्मेंद्र यांच्या घराबाहेर चाहत्यांची वर्दळ वाढली. त्यांच्या प्रकृतीची माहिती सतत घेत असलेले बॉलिवूडमधील अनेक कलाकारही त्यांच्या भेटीसाठी धावले होते. निधनाची बातमी बाहेर आल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन हे थेट विलेपार्ले येथील स्मशानभूमीकडे रवाना झाले. हेमा मालिनी देखील स्मशानभूमीत पोहोचल्या असून कुटुंबातील सदस्य अंत्यसंस्काराची तयारी करताना दिसले.
सिनेसृष्टीत 'ही-मॅन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धर्मेंद्र यांनी आपल्या सहा दशकांच्या प्रवासात ३०० पेक्षा अधिक चित्रपटांत काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विविध भूमिकांमधील त्यांचा सहज अभिनय, अॅक्शन-हिरोची प्रतिमा आणि रोमँटिक persona यामुळे ते आजही चाहत्यांच्या मनात विशेष स्थान राखून आहेत. याच दरम्यान, आमिर खान देखील श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी स्मशानभूमीकडे रवाना झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
चित्रपट निर्माता करण जोहर यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत धर्मेंद्र यांच्या जाण्याने “एका युगाचा अंत” झाल्याची भावना व्यक्त केली आहे.
रुग्णालयातून घरी आल्यानंतर स्वतः गाडी चालवत अमिताभ बच्चन यांनी धर्मेंद्र यांची भेट घेतली होती. दोघांनी मिळून अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले असल्याने त्यांच्यातील जवळीक विशेष होती. अभिनयासोबतच धर्मेंद्र यांनी राजकारणातही सक्रिय भूमिका बजावली होती.
धर्मेंद्र यांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. चाहत्यांनीही मोठ्या संख्येने स्मशानभूमीकडे धाव घेतली असून आपल्या आवडत्या अभिनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी गर्दी होत आहे.