८५ हरकती सादर, लवकरच निवडणूक होणार
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा अनेक ठिकाणी ओलांडल्यामुळे वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. मुंबई महापालिकेत आरक्षणाची मर्यादा ३४ टक्के आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक होणारच असे चित्र आहे. आरक्षणावर हरकती व सूचना मागवण्यासाठी दिलेल्या कालावधीत ८५ तक्रारी मुंबई महापालिकेकडे सादर झाल्या आहेत.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित करताना राज्य सरकारने १५९ ठिकाणी ५० टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली. यामुळे निर्माण झालेला वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला. मात्र मुंबई महापालिकेचा विचार करता या ठिकाणी आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आतच असून २२७ पैकी ३४.३६ टक्के प्रभाग आरक्षित आहेत.
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांपैकी इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के प्रमाणे ६१ जागा आरक्षित आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणात अनुसूचित जातींसाठी १५ जागा व अनुसूचित जमातीसाठी दोन जागा आरक्षित आहेत.
काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव
आरक्षण सोडतीत भाजप, काँग्रेस, शिवसेना (ठाकरे), शिवसेना (शिंदे) या पक्षांतील ज्येष्ठ व अनुभवी माजी नगरसेवकांचे प्रभाग आरक्षित झाले आहेत, तर काही विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. दहिसर, बोरिवली, वरळी यासारख्या काही ठिकाणी सर्व प्रभाग महिलांसाठी राखीव आहेत, तर मानखुर्द, शिवाजी नगरमध्ये सर्व प्रभाग आरक्षित झाले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी आहे.