ठाणे: मुंबई नजीकच्या अंबरनाथ शहरात काल (२१ नोव्हेंबर) संध्याकाळी अपघाताची मोठी दुर्घटना घडली. अंबरनाथ शहरातील पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या पुलावर ही अपघाताची दुर्घटना घडली. ज्यात एका भरधाव चारचाकीने अनेक वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की एकजण थेट ब्रिजच्यावरून खाली कोसळला. या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.
अंबरनाथ शहरातील हुतात्मा चौकाहून निघालेली एक चारचाकी वाहतूककोंडी नसल्याने वेगाने अंबरनाथ पश्चिमेकडे जात होती. यावेळी चालकाला गती नियंत्रित न झाल्याने गाडीवरील ताबा सुटला. ज्यामुळे अनियंत्रित गाडी पुढे असणाऱ्या आणि विरूद्ध दिशेने येणाऱ्या इतर गाड्यांना धडकली. यामुळे इतर गाड्यांचे नुकसान तर झालेच, पण नागरिकांना पण फटका बसला. पोलीस सध्या घटनेचा सखोल तपास करत आहेत.
या अपघातांमध्ये धडक देणारी भरधाव कारदेखील पलटी झाली. संबंधित घटना पुलावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे अपघाताचे तपशील समजण्यात मदत झाली. मात्र या व्हिडीओमुळे थरकाप उडाला आहे. या घटनेतील जखमींवर उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर काही जखमींवर खासगी रुग्णालयातही उपचार सुरु असल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात सध्या पोलीस गाडी मालकाची आणि चालकाची तपासणी करत आहेत.