मुंबई : विक्रोळी पार्कसाइट परिसरात राहणारे शिउबाठाचे पदाधिकारी सुरेंद्र पाचाडकर यांची घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ सीजीएस कॉलनी येथे दिवसाढवळ्या हत्या झाली. या प्रकरणात १९ वर्षांच्या अमन वर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे.
सुरेंद्र पाचाडकर हे घाटकोपर रेल्वे स्थानक परिसरात फेरफटका मारत असताना आरोपी अमन वर्माचा त्यांना धक्का लागला. यातून झालेल्या शाब्दिक बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. अमनने लोखंडी रॉड सुरेंद्र पाचाडकर यांच्या डोक्यात घातला. या हल्ल्यामुळे सुरेंद्र पाचाडकर यांचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना गुरुवार २० नोव्हेंबर २०२५ रोजी घडली. या प्रकरणात हत्येच्या आरोपात पोलिसांनी अमन वर्माला अटक केली आहे.
परिसरातील सीसीटीव्ही फूटेजमध्ये अमन वर्माने केलेल्या धक्क्दायक कृत्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. फूटेज बघितल्यानंतर पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. अवघ्या पाच तासांत पोलिसांनी आरोपी अमन वर्मा याला रमाबाई कॉलनी येथून अटक केली. अमन वर्मा विरोधात पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
कोण होते सुरेंद्र पाचाडकर ?
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक अशी सुरेंद्र पाचाडकर यांची ओळख होती. ते नियमितपणे शिवसेना शाखेत येऊन जनतेची कामं करायचे. जनसंपर्क वाढवण्यासाठी विशेष मेहनत घ्यायचे. शिवजयंतीच्या कार्यक्रमात ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत चित्ररथावर उभे राहायचे. यामुळे त्यांना 'महाराज' या टोपणनावानेही ओळखले जात होते.