पुणे : जिथे दैनंदिन जीवनात पैशासाठी लोक अनेकदा अनैतिक मार्ग स्वीकारताना दिसतात, तिथे पुण्यातील एका मेहनती महिलेने समाजासमोर प्रामाणिकतेचे उत्तम उदाहरण ठेवले आहे. कचरावेचक कामगार अंजू माने यांनी दाखवलेली सचोटी खरोखर प्रेरणादायी आहे. रोजच्या जगण्यासाठी कष्ट करणाऱ्या या महिलेला कचरा वेचताना १० लाखांहून अधिक रक्कम असलेली बॅग सापडली, तरीही पैशाच्या मोहापुढे झुकण्याऐवजी त्यांनी ती बॅग तिच्या मूळ मालकाकडे सुरक्षितरित्या परत केली.
अंजू माने या स्वच्छ संस्थेत कचरावेचक म्हणून काम करतात. त्यांच्या तीन पिढ्या हेच काम करत आल्या असून, स्वतः अंजू गेली तब्बल २० वर्षं पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात कचरा गोळा करण्याचे काम करत आहेत. नेहमीप्रमाणे त्या सकाळी सात वाजता दारोदार कचरा गोळा करत होत्या. आठच्या सुमारास फिडर पॉइंटकडे कचरा नेत असताना रस्त्याच्या कडेला एक मोठी पिशवी पडलेली त्यांना दिसली. परिसरात औषधांची दुकाने असल्याने अशा पिशव्या आधीही मिळाल्याचा अनुभव त्यांना होता. म्हणून मालक परत येईल या विश्वासाने त्यांनी ती पिशवी सुरक्षित ठेवली. नंतर त्यात औषधांसोबत मोठी रोकड असल्याचे दिसताच त्यांनी तातडीने परिसरातील लोकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली.
त्या परिसरात अनेक वर्षं काम केल्यामुळे अंजू सर्वांना ओळखतात. शोध घेत असताना एक डिलिव्हरी बॉय अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत काहीतरी शोधताना दिसला. चौकशी केल्यानंतर तीच बॅग त्याची असल्याची खात्री झाली आणि अंजूंनी क्षणाचाही विलंब न करता ती बॅग त्याला परत केली. अत्यंत मौल्यवान रक्कम परत मिळाल्याने त्याला दिलासा मिळाला आणि त्याने कृतज्ञतेच्या भावनेतून अंजूंना ६०० रुपये बक्षीस दिले.
अंजूताई म्हणाल्या, “आपल्याकडचे काहीशे रुपये हरवले तरी मनातून जात नाही. इथे दहा लाखांची रक्कम होती. ती व्यक्ती किती चिंतेत असेल, याचाच विचार माझ्या मनात होता.”
अंजू माने यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिन्ही मुलींना त्यांनी शिक्षण दिले असून मुलगा वैद्यकीय क्षेत्रात काम करतो. पती बाळासाहेब मानेही त्यांना कामात मदत करतात. हातात फक्त आठ हजार रुपयांचे मासिक उत्पन्न असतानाही पैशांचा लालच न ठेवता अंजू माने यांनी दाखवलेली निस्वार्थ भावना आज सर्वांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.