मुंबई : काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्यामुळे मुंबईत राडा झाला. मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर ही घटना घडली. मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते अस्लम शेख आणि मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. अलिकडेच भाजपच्या मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र पाठवले. या पत्रात त्यांनी अस्लम शेख धमकावत असल्याचे नमूद करून कारवाईची मागणी केली. लोढा यांच्या मागणीला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. धमकी देणारे अस्लम शेख आणि त्यांच्या बेकायदा वर्तन करणाऱ्या समर्थकांवर कायदेशीर कारवाई व्हायलाच हवी तसेच अस्लम शेख यांनी मालाडमध्ये उभारलेली रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची वस्ती पाडून घुसखोरांना त्यांच्या देशात परत पाठवून द्यावे, अशीही मागणी अमित साटम यांनी घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुंबईत आज म्हणजेच शनिवार २२ नोव्हेंबर २०२५ रोजी राडा झाला.
अंधेरी पश्चिम येथील अमित साटम यांच्या कार्यालयावर काँग्रेसने मोर्चा नेला होता. यावेळी अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. काँग्रेसचा आक्रमक पवित्रा बघून भाजपचे कार्यकर्तेही पुढे सरसावले आणि त्यांनी अमित साटम आणि त्यांच्या ऑफिसला काहीही होऊ नये यासाठी काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखून धरण्यासाठी आवश्यक हालचाली केल्या. या दरम्यान काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये थेट संघर्ष झाला. पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा आल्यामुळे तणाव वाढेल ही शक्यता गृहित धरुन पुरेशी खबरदारी घेतली होती. अमित साटम यांच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बॅरिकेटिंग करुन बंदोबस्त ठेवला होता. यामुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
काय म्हणाले अमित साटम ?
"अस्लम शेख यांना सांगू इच्छितो, आपल्या सारख्या पाकिस्तानच्या औलादींना आम्ही अजिबात भीक घालत नाहीत. तुम्ही मालाडमध्ये ज्याप्रकारे मालवणी पॅर्टन चालवेला आहे तो उखडून फेकल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाहीत. येणाऱ्या काळात तुमच्यासारखी हिरवी पिलावळं या मुंबईत गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाहीत. त्यामुळे अशाप्रकारचे आरोप आणि वल्गना कदापी करु नये. कायद्याच्याआधीन राहून तुमच्यावर कारवाई होईल", असं अमित साटम म्हणाले होते.