मोहित सोमण: कोटक महिंद्रा बँकेकडून गुंतवणूकदारांना मोठे सरप्राईज देण्यात आले आहे. कोटक महिंद्रा बँकेच्या चाळीसाव्या वर्धापनदिना निमित्त संचालक मंडळाने स्टॉक स्प्लिटला (Stock Split) या योजनेला मान्यता दिली आहे. त्यामुळे आता बँकेच्या भागभांडवलधारकांना एक ५ रुपये दर्शनी मूल्य (Face Value) असलेल्या शेअरचे प्रत्येकी १ रूपये प्रमाणे दर्शनी मूल्य असलेल्या ५ शेअरमध्ये रूपांतर होणार आहे. म्हणजेच ५ रुपये प्रति शेअर दर्शनी मूल्य असलेल्यांना एका शेअर बदल्यात पाच शेअर मिळणार आहेत.
२१ नोव्हेंबरच्या संचालक मंडळाने घेतलेल्या निर्णयाला अंतिम मोहोर बैठकीत लागल्याचे कंपनी रेग्युलेटरी फायलिंगमध्ये स्पष्ट केले आहे. नेमक्या शब्दात बँकेने म्हटले आहे की त्यांनी त्यांच्या इक्विटी शेअर्सच्या उपविभाजनाला (Stock Split) मान्यता दिली आहे. ५ रुपये दर्शनी मूल्य असलेला एक विद्यमान इक्विटी शेअर प्रत्येकी १ रुपये दर्शनी मूल्य असलेल्या पाच इक्विटी शेअर्समध्ये विभागला जाईल. विभाजनानंतर सर्व शेअर्स पूर्णपणे भरलेले राहतील.'
सामान्य गुंतवणूकदारांना परवडणाऱ्या दरात शेअरची उपलब्धता व्हावी व खासकरुन बाजारातील व शेअरमधील तरलता (Liquidity) वाढवण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट म्हटले आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार गेल्या १५ वर्षांतील हे पहिले विभाजन असेल. अद्याप कंपनीने रेकॉर्ड तारीख स्पष्ट केलेली नाही. लवकरच या संदर्भात बँक माहिती एक्सचेंजला कळवणार आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे हंगामी अध्यक्ष सी. एस. राजन म्हणाले आहेत की,'आमच्या प्रवासाची ४० वर्षे साजरी करत असताना, आम्ही आमच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन मूल्य निर्माण करण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पुष्टी करतो. हा टप्पा केवळ आमच्या वारशाचे प्रतिबिंब नाही तर भविष्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या महत्त्वपूर्ण प्रसंगी, बँकेचे इक्विटी शेअर्स अधिक परवडणारे आणि तरल बनवून व्यापक गुंतवणूकदारांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी, बोर्डाने, नियामक आणि वैधानिक मंजुरींच्या अधीन राहून, ५/- च्या दर्शनी मूल्याच्या विद्यमान इक्विटी शेअर्सचे १/- च्या लहान मूल्याच्या इक्विटी शेअर्समध्ये विभाजन करण्याचा निर्णय घेतला आहे.'
कोटक महिंद्रा बँकेच्या दुसऱ्या तिमाहीत इयर ऑन इयर बेसिसवर (YoY) निव्वळ नफ्यात २.७% घसरण झाली होती. तर बँकेच्या ऑपरेटिंग नफ्यात इयर ऑन इयर बेसिसवर ३% वाढ झाली होती. तर निव्वळ व्याज उत्पन्नात (Net Interest Income NII) इयर ऑन इयर बेसिसवर ४% वाढ झाली होती. आज कोटक महिंद्रा बँकेचा शेअर अखेरीस ०.५८% घसरत २०८६.५० रूपये प्रति शेअरवर स्थिरावला आहे.