गुवाहाटी : पहिल्या कसोटी दरम्यान झालेल्या गंभीर दुखापतीनंतर शुभमन गिलची मैदानात पुनरागमन करण्याची शक्यता कमी होत चालली आहे. फलंदाजीसाठी उतरल्यानंतर काहीच चेंडूत त्याची मान लचकली आणि वेदना वाढत गेल्याने त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये हलवावे लागले. उपचारासाठी ICU मध्ये दाखल करण्यात आलेल्या शुभमनला आता बरं वाटत असलं तरी दुसऱ्या कसोटीसाठी तो फिट नाही, हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.भारतीय संघाच्या व्यावसायिक डॉक्टरांनी प्रयत्न केले, पण दुखापतीमुळे शुभमन पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावातही मैदानात उतरू शकला नाही. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत त्याच्या जागी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष होते.
सूत्रांच्या माहितीनुसार शुभमन गिलच्या जागी इंग्लंड दौऱ्यावर खेळलेला डावखुरा फलंदाज साई सुदर्शनला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर संघाचे नेतृत्व ऋषभ पंतकडे जाणार असल्याचेही संकेत आहेत. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात एक महत्त्वाचा बदल पाहायला मिळणार आहे. पहिली कसोटी हातातून गेल्यानंतर टीम इंडिया आता मालिकेत परतण्यासाठी दुसऱ्या कसोटीमध्ये कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.