सीएनजी, पेट्रोल व डिझेलची करणार विक्री
निविदा प्रक्रियेला वेग, ७० वर्षे सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून इंधन खरेदी, सामान्य ग्राहकालाही मिळणार इंधन
मुंबई : राज्य परिवहन महामंडळाकडून उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यासाठी महामंडळ व्यवस्थापनाने राज्यातील विविध २५१ ठिकाणी सीएनजीसह पेट्रोल, डिझेल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडण्यास मदत होणार आहे. व्यवस्थापनाकडून निविदा प्रक्रियाही राबवण्याची प्रक्रियेला वेग आले आहे.
परिवहन महामंडळाने उत्पन्न वाढीचाच एक भाग म्हणून पुढील काळात पेट्रोल, डिझेल पंप सुरू करत त्याच्या विक्रीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार यासाठीची प्रक्रिया आता सुरू केली आहे. उत्पन्नाचा नवा मार्ग निर्माण करण्याच्याच उद्देशाने महामंडळाच्या मालकीच्या जागेवर २५१ पेक्षा अधिक ठिकाणी हे पंप उभारले जाणार आहेत.व्यावसायिक तत्त्वावर पेट्रोल, डिझेल यासह सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटचे रिटेल विक्री (किरकोळ विक्री) पंप सुरू केला जाणार आहे.
महामंडळाने व्यावसायिक तत्त्वावर समुदाय इंधन विक्री केंद्र उभारण्यासाठी निविदा प्रक्रिया देखील सुरू केली आहे. ज्या ठिकाणी महामंडळाच्या बससाठी इंधन भरले जाते, तिथेच सामान्य ग्राहकालाही किरकोळ पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि इलेक्ट्रिक चार्जिंगची विक्री करणे शक्य होईल. ७० वर्षांहून जास्त वर्षे परिवहन महामंडळ इंडियन ऑईलसह हिंदुस्तान व भारत पेट्रोलियम आदी सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडून डिझेल इंधन विकत घेत आहे.