मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेनेच्या मंत्र्यांनी आज झालेल्या कॅबिनेट बैठकीवर बहिष्कार टाकला. बैठक झाल्यावर सेनेचे मंत्री थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. या भेटीत भाजपमधील वाढत्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा झाली. शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना भाजप पक्षप्रवेश देत असल्याचा थेट आरोप शिवसेनेच्या मंत्र्यांनी केला. यावर शिवसेनेच्या मंत्र्यांनाच फडणवीसांनी खडे बोल सुनावले. मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांना उल्हासनगरात प्रवेश देऊन फोडाफोडीच्या राजकारणाला आपण सुरुवात केल्याचे फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले.
काय म्हणाले फडणवीस?
काही दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील शिवसेनेने भाजपच्या काही माजी नगरसेवकांना आपल्या गळाला लावले होते. ही ताजी घटना फडणवीसांनी शिवसेनेच्या मंत्र्यांसमोर मांडली. फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात तुम्ही केली आणि आता आक्षेप देखील तुम्हीच नोंदवत आहात असे देखील फडणवीस म्हणाले. आज कॅबिनेट बैठकीपूर्वी शिवसेनेच्या मंत्र्यांची बैठक झाली. मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात होत असलेल्या कॅबिनेटला शिवसेनेचे मंत्री गेलेच नाहीत. परंतु मी उपमुख्यमंत्री आहे त्यामुळे मला बैठकीला उपस्थित राहावे लागेल असे सांगून एकनाथ शिंदे बैठकीस उपस्थित राहिले.
शिवसेनेची सर्वात मोठी नाराजी ही, देवेंद्र फडणवीसांकचे निकटवर्तीय आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावर आहे. चव्हाण यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून पक्षप्रवेशाची जणू रांगच लावली आहे. शिवसेनेचे मंत्री, आमदार, माजी नगरसेवक असलेल्या मतदारसंघांमध्येच चव्हाण विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश करून घेत आहेत आणि त्यामुळेच शिवसेनेची अधिक नाराजी चव्हाण ओढवून घेत आहेत.