बारामती : बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 'सहयोग सोसायटी' या निवासस्थानासमोर अघोरी पूजा आणि भानामतीचा प्रकार उघडकीस आला आहे. आज सकाळी हा प्रकार समोर आला. निवडणुकीच्या तोंडावर अशी घटना घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे 'कुणाचं तिकीट मिळविण्यासाठी किंवा कुणाचं तिकीट कापण्यासाठी तर हा प्रकार केला नाही ना?' अशी जोरदार चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे. यामागे काहीतरी वेगळे करण्याच्या हेतूने हा प्रकार केला गेला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे.
महाराष्ट्रात २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींसाठी २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी ३ डिसेंबर २०२५ रोजी होणार आहे. एकूण ६,८५९ जागांसाठी मतदान होणार आहे. २८८ नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदासाठी थेट पद्धतीने निवडणूक होईल. नगरपालिकांसाठी दोन सदस्यीय प्रभाग पद्धत तर नगरपंचायतींसाठी एक सदस्यीय प्रभाग पद्धत आहे. नगरपालिकांमध्ये मतदारांना नगराध्यक्षपदासाठी एक तर प्रभागासाठी दोन अशी तीन मते द्यावी लागणार आहेत. नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष व सदस्यपदासाठी प्रत्येकी एक अशी दोन मते द्यावी लागतील. उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. यामुळे मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांची निवडणूक कधी होणार हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. निवडणुकीची ही धामधूम सुरू असतानाच अजित पवारांच्या घराबाहेर घडलेल्या प्रकारामुळे चर्चेला उधाण आले आहे.
उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाजवळ अशा प्रकारे लिंबू-नारळ, हळद-कुंकू ठेवले जाणे सामान्य नसून, हा अंधश्रद्धेच्या हेतूने केलेला प्रकार असू शकतो अशी दाट शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. कालच नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीसाठीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. आता उमेदवारांनी केलेल्या अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू आहे आणि याच दरम्यान हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
हा प्रकार नक्की काय आहे? आणि हे कोणी केले? याचा सखोल तपास व्हावा अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे आणि पोलिसांनी देखील परिसरातील सीसीटीव्ही फूटेज तपासून दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे.
राज्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक
नगरपालिका : २४६
नगरपंचायती : ४२
एकूण जागा : ६,८५९
अर्ज दाखल प्रक्रिया : १० ते १७ नोव्हेंबर
अर्ज माघार : २१ नोव्हेंबरपर्यंत
मतदान : २ डिसेंबर
मतमोजणी : ३ डिसेंबर
विभागनिहाय नगरपालिका व नगरपंचायती
कोकण : २७, नाशिक : ४९, पुणे : ६०, छत्रपती संभाजीनगर : ५२, अमरावती : ४५, नागपूर : ५५