छत्रपती संभाजीनगर : मराठवाडा मुक्ती संग्राम लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांनी तरुणाईमध्ये देशभक्ती जागृत केली. तसेच महिला व अनेक स्वातंत्र्यसैनिकांना सोबत घेऊन निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाड्याला मुक्त केले. त्यांचे हे योगदान अमूल्य आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. क्रांती चौक येथील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे, तसेच ऑनलाईन पद्धतीने ऐतिहासिक कमल तलावाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, राज्यसभेचे खासदार डॉ.भागवत कराड, आमदार संजय केणेकर, आमदार अनुराधा चव्हाण, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासह मराठवाडा मुक्ती संग्रामात योगदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबिय उपस्थित होते.
स्वामी रामानंद तीर्थ यांचे संपूर्ण जीवन व्रतस्थ होते. स्वामी विवेकानंदांप्रमाणेच तरुणाईमध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांनी देशभक्ती जागृत केली. भारत स्वतंत्र झाल्यानंतर मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळण्याकरिता आणखी १३ महिने लागले. रझाकारांनी अन्याय करायला सुरुवात केली होती. या काळात मराठवाडा निजामाच्या इस्टेटचा भाग होता. अखेर रझाकार विरोधात रणसंग्राम सुरू झाला. स्वामी रामानंद तीर्थ यांनी या लढ्यात नेतृत्व करुन हैदराबाद, मराठवाड्यात स्वतंत्र अस्मितेची ज्योत पेटवली. त्यातून अनेक तरुण, महिला या स्वातंत्र्यसंग्रामामध्ये सहभागी झाले. तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी या स्वतंत्र संग्राम सेनानींच्या हाकेला प्रतिसाद देत पोलीस कारवाई केली आणि १७ नोव्हेंबर १९४८ रोजी मराठवाडा मुक्त केला. या स्मृतींना उजाळा देत स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. त्यांनी स्वामी रामनंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे शिल्पकार निरंजन मडिलगेकर यांचा याप्रसंगी सत्कार केला.