उबाठा गटाचे स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे संकेत
अलिबाग : अलिबाग नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची घोषणा शेकाप नेते शेकाप नेते जयंत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केली होती; परंतु आता आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे स्पष्ट चित्र आहे. अलिबागमधील प्रमुख घटक पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष एकही जागा सोडण्यास तयार नसल्याने शिवसेना या आघाडीतून बाहेर पडल्यात जमा आहे.
अलिबाग शहरातील २० जागांपैकी शेकापने दान जागा महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला दिल्या आहेत. काँग्रेसने या जागांवर अभय महामुणकर आणि समीर ठाकूर यांना उमेदवारी जाहीर करीत ते प्रचारालाही लागले आहेत. शिवसेनेने शेकापकडे तीन जागांची मागणी केली होती; परंतु अद्यापपर्यंत एकही जागा देण्याची तयारी शेकापने दाखविलेली नाही. मागील अलिबाग नगरपालिका निवडणुकीत शेकापचे सर्व १७ जागांवर उमेदवार निवडून आले होते. आता नवीन नगरपालिकेत २० जागा असणार आहेत. त्यातील तीन जागा आपल्यालाच मिळाव्यात, अशी शिवसेना ठाकरे गटाची अपेक्षा आहे; परंतु कुठली जागा द्यायची, असा पेच शेकापसमोर आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसेनेचे संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. जर शेकापने आमचा विचार केला नाही, तर स्वतंत्र निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी तीन दिवस उरलेले असतानाही शेकापकडून प्रतिसाद मिळत नसल्याने तीन ते चार जागा लढविण्याचा निर्णय शिवसेनेने घेतल्याची माहिती जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी ‘दैनिक प्रहार’शी बोलताना दिली.