पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा मिलाफ असलेला बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘गोंधळ’ आता आंतरराष्ट्रीय पातळीवर झळकणार आहे. गोवा येथे होणाऱ्या भारत सरकारच्या ५६ व्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियाच्या ‘इंडियन पॅनोरमा गोल्डन पिकॅाक सेक्शन’मध्ये ‘गोंधळ’ची अधिकृत निवड झाली आहे. त्यामुळे गोंधळ चित्रपटाबद्दलची उत्सुकता आता प्रेक्षकांमध्ये अधिकच वाढली आहे.
या फेस्टिव्हलमध्ये ‘आता थांबायचं नाय!’ आणि ‘गोंधळ’ या चित्रपटांची निवड झाली असून या दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांचे हे दिग्दर्शकीय पदार्पण आहे. मात्र ‘गोंधळ’ने एक पाऊल टाकत ‘इंडियन पॅमोरमा गोल्डन पिकाॅक अॅवाॅर्ड’ विभागात स्थान पटकावले आहे. ‘सेलिब्रेट द जॉय ऑफ सिनेमा’ या घोषवाक्याने साजरा होणाऱ्या या प्रतिष्ठित महोत्सवात ‘गोंधळ’ची निवड होणे ही मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानाची बाब ठरत आहे.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक संतोष डावखर दिग्दर्शित आणि डावखर फिल्म्स प्रस्तुत हा चित्रपट आपल्या मातीत रुजलेल्या परंपरा, लोककला आणि श्रद्धांचा अनोखा संगम दाखवतो. ‘गोंधळ’हा चित्रपट आजच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष डावखर म्हणतात, “आमच्या टीमसाठी ही अतिशय अभिमानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. गोंधळ सिनेमाची निवड भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने आयोजिलेल्या इफ्फी सारख्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणे म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीचा सन्मान आहे. आमच्या कलेला जागतिक पातळीवर ओळख मिळत आहे, यापेक्षा मोठं बक्षीस काही असूच शकत नाही.”